नवी दिल्ली : वृत्तसंस्था
दिग्गज टेक कंपनी मायक्रोसॉफ्टच्या सर्व्हरमध्ये झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे जगभर एकच गोंधळ उडाला. मायक्रोसॉफ्ट ही जगातील दुसरी मोठी व्हॅल्यूएबल कंपनी आहे. त्याचे मार्केट कॅप ३.२७२ ट्रिलियन डॉलर इतके आहे. तांत्रिक बिघाडामुळे विमानसेवा, मीडिया, बँक, रेल्वे सेवा, शेअर बाजार अशा अनेक ठिकाणचे कामकाज ठप्प झाले. या कंपनीचे सीईओ भारतीय वंशाचे सत्या नडेला आहेत. नडेला यांनी २०१४ साली या कंपनीचे प्रमुख म्हणून कार्यभार स्विकारला होता. त्यांच्या नेतृत्वाखाली मायक्रोसॉफ्टने टेक इनोवेटर म्हणून स्वत:ला पुन्हा एकदा सिद्ध केले.
सत्या नडेला यांचा जन्म हैदराबाद येथे १९६७ साली झाला. त्यांचे वडील एक प्रशासकीय अधिकारी होते तर आई संस्कृत भाषेची शिक्षक होती. सत्या याचे प्राथमिक शिक्षण हैदराबाद येथील पब्लिक स्कूलमध्ये झाले. १९८८ साली त्यांनी मनिपाल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथून इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पूर्ण केले. त्यानंतर ते कॉम्यूटर सायन्समध्ये एमएस करण्यासाठी अमेरिकेला गेले. १९९६ साली त्यांनी शिकागोच्या बूथ स्कूल ऑफ बिझनेसमधून एमबीए पूर्ण केले.
मायक्रोसॉफ्टमध्ये नोकरी
शिक्षण पूर्ण झाल्यानंतर सत्या नडेला यांनी सन मायक्रोसिस्टम्स कंपनीत टेक्नॉलॉजी टीममध्ये काम सुरू केले. १९९२ साली ते मायक्रोसॉफ्टमध्ये रूजू झाले. तेव्हापासून ते याच कंपनीत आहेत. मायक्रोसॉफ्टसोबत इतकी वर्षे काम केल्याने अनेक प्रोजेक्टवर काम केले. या कंपनीत त्यांची सुरुवात सर्व्हर ग्रुपपासून झाली होती. त्यानंतर सॉफ्टवेअर विभाग, ऑनलाइन सर्व्हिसेस, रिसर्च अॅण्ड डेव्हलपमेंट, जाहिरात विभाग आदी ठिकाणी काम केल्यानंतर ते पुन्हा सर्व्हर विभागाचे प्रमुख झाले.
क्लाउड गुरू
सत्या नडेला यांना क्लाउड गुरू असे म्हटले जाते. मायक्रोसॉफ्टमध्ये त्यांनी क्लाउड कम्यूटिंगचे नेतृत्व केले आणि कंपनीला जगातील सर्वात मोठी क्लाउड इफ्रास्ट्रक्चर म्हणून स्थान मिळवून दिले. मायक्रोसॉफ्टच्या ऑनलाइन सर्व्हिसेस विभागात वरिष्ठ उपाध्यक्ष आणि कंपनीत बिझनेस डिव्हिजनमध्ये उपाध्यक्ष म्हणून काम केले. त्यानंतर कंपनीने १९ अब्ज अमेरिकन डॉलरच्या सर्व्हिस अॅण्ड टूल व्यवसायाचे अध्यक्ष म्हणून त्यांच्यावर जबाबदारी दिली. मायक्रोसॉफ्टच्या डेटाबेस, विंडोज सर्व्हर आणि डेवलपर टूल्स यांना मायक्रोसॉफ्टच्या अज्योर क्लाउड प्लॅटफॉर्मवर आणण्यात त्यांची महत्त्वाची भूमिका होती.
नडेला बनले सीईओ
२०१४ साली मायक्रोसॉफ्टने नडेला यांची सीईओपदी नियुक्ती केली. जेव्हा नडेला यांनी हे पद स्विकारले तेव्हा कंपनीत अनेक अडचणी होत्या. नडेला यांनी कंपनीला या सर्व अडचणीतून फक्त बाहेर काढले नाही तर एका नव्या उंचीवर पोहोचवले. त्यांनी क्लाउड कंप्यूटिंग, मोबाइल अॅप्लिकेशन आणि आर्टिफिशियल इंटेलिजेंसवर फोकस केला. त्याच बरोबर ऑफिस सॉफ्टवेअरमध्ये नवचैतन्य आणले. २०२१ साली कंपनीने त्यांना चेअरमन केले.
अनुपमाशी विवाह
सत्या नडेला यांनी १९९२ साली अनुपमा यांच्याशी विवाह केला. अनुपमा या सत्या यांच्या वडिलांचे मित्राची मुलगी आहे. ते कुटुंबासह वॉशिंग्टन येथे राहतात. क्रिकेट हा त्यांच्या आवडीचा खेळ आहे. नडेला यांना फिटनेसची आवड आहे आणि ते नियमितपणे धावतात. नडेला यांना गोड पदार्थ आवडतात आणि पेस्ट्री त्यांना सर्वाधिक आवडते.
एकूण संपत्ती...
नडेला यांची नेटवर्थ ७ हजार ५०० कोटी रुपये इतकी आहे. २०२३ साली त्यांना ४.८५ कोटी डॉलर म्हणजे ४,०३,६४,६३,४२५ रुपये इतका पगार मिळाला होता. ज्यातील २, ५००,००० डॉलर ही बेसिक सॅलरी तर ५,४१४, ७५० डॉलर हा बोनस होता. त्यांना स्टॉक ऑप्शन मिळाला नाही तर ३९,२३६,१३७ डॉलरचे स्टॉक्स मिळाले. कंपनसेशन म्हणून ३६१, ६५० डॉलर इतकी रक्कम मिळाली.