मायक्रोसॉफ्टची सेवा ठप्प, जगभरात हाहाकार

yongistan
By - YNG ONLINE
विमानसेवा, बँका, शेअर बाजाराला फटका

न्यूयॉर्क : वृत्तसंस्था
जगातील सर्वांत मोठी आयटी कंपनी मायक्रोसॉफ्टच्या सर्व्हरमधील तांत्रिक बिघाडामुळे शुक्रवार, दि. १९ जुलै २०२४ रोजी संपूर्ण जगातील कामकाज ठप्प झाले असून याचा परिणाम उड्डाणे, विमानतळ, बँका आणि शेअर बाजारासह सर्व क्षेत्रांवर झाला. भारतातील एअरलाइन्समध्ये इंडिगो, स्पाइसजेट आणि आकासा एअरच्या फ्लाईटस्चे बुकिंग आणि चेक इन सेवांवर परिणाम झाला. तसेच भारतीय शेअर बाजारावरही परिणाम पाहायला मिळाला. यावर मायक्रोसॉफ्ट ३६५ ने या प्रकरणाची सध्या सखोल चौकशी सुरू असल्याचे सांगितले.

मायक्रोसॉफ्ट या दिग्गज टेक कंपनीच्या सर्व्हरमधील बिघाडामुळे जगातील सर्वात मोठ्या कंपन्यांपैकी एक मायक्रोसॉफ्टच्या सेवांवर शुक्रवारी विपरीत परिणाम झाला. विंडोज १० ऑपरेटिंग सिस्टीमवर परिणाम करणा-या सॉफ्टवेअर अपडेटमुळे केवळ सामान्यांनाच नाही तर जगभरातील विविध क्षेत्रातील अनेक कंपन्यांच्या कामकाजावरही विपरीत परिणाम झाला. जगभरातील एअरलाइन्स, रेल्वे, बँकिंग आणि वित्त, स्टॉक एक्स्चेंज, मीडिया आणि टीव्ही चॅनेल, ऑनलाइन स्टोअर्स, रुग्णालये आणि आयटी क्षेत्रांवर सर्वाधिक प्रभाव दिसून आला. भारत, ऑस्ट्रेलिया, जर्मनी, अमेरिका, ब्रिटन आणि इतर देशांसह जगभरातील अनेक आयटी  प्रणालींमधील अनेक सेवांवर परिणाम झाला.

जगातील बहुतांश संगणक आणि लॅपटॉप मायक्रोसॉफ्ट ऑपरेटिंग सिस्टमवर चालतात. त्यावर काम करणा-या सर्व यंत्रणा ठप्प झाल्या. भारतीय शेअर बाजारालाही फटका बसला. देशांतर्गत शेअर मार्केट गुंतवणूकदारही या तांत्रिक बिघाडामुळे हैराण झाले आहेत. अनेक ब्रोकरेजमध्ये तांत्रिक अडचणी येत आहेत. विमान कंपन्यांच्या उड्डाणांवर परिणाम झाला. भारत आणि अमेरिकेसह अनेक देशांतील विमानांच्या उड्डाणांवर परिणाम झाला. दलाल स्ट्रीटवरील व्यापा-यांना याचा मोठा फटका बसला.