अशी आहे युवा कार्य प्रशिक्षण योजना

yongistan
By - YNG ONLINE
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची माहिती
मुंबई : प्रतिनिधी
राज्य सरकारने २०२४-२५ च्या अर्थसंकल्पात विविध योजना जाहीर केल्या. यामध्ये राज्यातील युवकांसाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना जाहीर करण्यात आली आहे. या योजनेद्वारे बारावी उत्तीर्ण असलेल्या युवकांना ६ हजार रुपये, पदविका उत्तीर्ण असणा-यांना ८ हजार आणि पदवी उत्तीर्ण असणा-यांना १० हजार रुपये देण्यात येणार आहेत.
 राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंढरपूरमध्ये बोलताना या योजनेविषयी माहिती दिली. माझी लाडकी बहीण योजनेप्रमाणे लाडक्या भावांसाठी देखील योजना आणल्याचे त्यांनी म्हटले. 

बारावी उत्तीर्ण, आयटीआय, पदविका आणि पदवी उत्तीर्ण असणा-या युवकांना त्यांनी नोंदणी केल्यानंतर या योजनेचा लाभ दिला जाईल. मात्र, ज्या उमेदवारांचे शिक्षण सुरू असेल त्यांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही. अर्ज दाखल करणा-या युवकांचे वय १८ ते ३५ वर्षे असणे आवश्यक आहे. राज्य सरकार महाराष्ट्राचे रहिवासी असणा-या विद्यार्थ्यांना स्टायपेंड म्हणून रक्कम देणार आहे. युवकांनी अर्ज दाखल केल्यानंतर राज्य सरकारकडे नोंदणी केलेल्या कंपन्यांमध्ये प्रशिक्षण दिले जाणार आहे. युवकांना संबंधित कंपन्यांमध्ये सहा महिने प्रशिक्षण कालावधी पूर्ण करावा लागणार आहे. युवकांना ६ महिनेच स्टायपेंडची रक्कम दिली जाणार आहे. 

दरवर्षी १० लाख 
युवकांना प्रशिक्षण
राज्य सरकार युवकांच्या विद्यावेतनाचा खर्च करणार आहे. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेद्वारे दरवर्षी १० लाख युवकांना प्रत्यक्ष कामावरील प्रशिक्षण देण्यासाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना राबवण्यात येणार आहे. युवकांनी प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर संबंधित कंपनीकडून त्यांना प्रमाणपत्र दिले जाणार आहे. कंपनीला युवकाचे काम योग्य वाटल्यास त्यांना तिथे नोकरी मिळू शकते.