जगज्जेता टीम इंडियाला ११कोटींचे बक्षीस

yongistan
By - YNG ONLINE
मुख्यमंत्र्यांची घोषणा, महाराष्ट्रातील क्रिकेटपटूंचा सन्मान
मुंबई : प्रतिनिधी
भारतीय क्रिकेट संघाने २९ जून रोजी टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धा जिंकली. भारतीय संघाने तब्बल १७ वर्षांनी टी-२० वर्ल्डकपवर नाव कोरले. त्यामुळे सध्या टीम इंडियावर कौतुक आणि बक्षिसांचा वर्षाव होत आहे. वानखेडे स्टेडियमवर गुरुवारी रात्री १२५ कोटींचे बक्षीस देऊन टीम इंडियाचा सन्मान केल्यानंतर शुक्रवार, दि. ५ जुलै २०२४ रोजी महाराष्ट्रातील ४ क्रिकेटपटूंचा विधानभवनातील सेंट्रल हॉल येथे सन्मान सोहळा पार पडला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी टीम इंडियाला ११ कोटींचे बक्षीस देण्याची घोषणा केली. महाराष्ट्र विधानभवनात पहिल्यांदाच अशा प्रकारचा सत्कार सोहळा पार पडला.
प्रारंभी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा बंगल्यावर भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा, शिवम दुबे, सूर्यकुमार यादव आणि यशस्वी जैयस्वाल या चार महाराष्ट्रीयन क्रिकेटपटूंचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर विधिमंडळातील सर्व सदस्यांच्या उपस्थितीत विधान भवनात रोहित शर्मा, शिवम दुबे, सूर्यकुमार यादव आणि यशस्वी जैयस्वाल या ४ क्रिकेटपटूंसह गोलंदाजी प्रशिक्षक पारस म्हांब्रे आणि मसाज थेरपिस्ट अरुण कानडे यांचा महाराष्ट्र शासनाकडून सत्कार करण्यात आला. त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही फटकेबाजी केली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संपूर्ण भारतीय संगासाठी ११ कोटींच्या बक्षिसाची घोषणा केली. या अगोदर राज्य सरकारने केवळ महाराष्ट्रातील ४ क्रिकेटपटूंनाच प्रत्येकी १ कोटी रुपये बक्षीस देण्याची घोषणा केली होती.  यावेळी त्यांनी आगामी काळात नव्या स्टेडियमसाठी जमिनीची गरज भासल्यास त्यासाठी मदतीचे आश्वासन दिले.

टीम इंडियाचा १२५ कोटी देऊन गौरव
तत्पूर्वी वानखेडे स्टेडियमवर गुरुवार, दि. ४ जुलै २०२४ रोजी टीम इंडियाच्या सत्काराचा कार्यक्रम झाला. जय शाह यांनी या ठिकाणी टीम इंडियाचा १२५ कोटी रुपये देऊन गौरव केला. या कार्यक्रमासाठी बीसीसीआयचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. हजारो चाहत्यांसमोर यावेळी रोहित शर्मा, विराट कोहली यांनी भाषण केले.