हरिभाऊ बागडे राजस्थानचे राज्यपाल
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
झारखंडचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची महाराष्ट्राचे नवे राज्यपाल म्हणून रविवार, दि. २८ जुलै २०२४ रोजी नियुक्ती करण्यात आली. राधाकृष्णन हे रमेश बैस यांची जागा घेतील तर भाजपचे ज्येष्ठ नेते हरिभाऊ बागडेंची राजस्थानच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे. देशाच्या राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांनी अनेक राज्यांत नवीन राज्यपालांच्या नियुक्त्या केल्या. यामध्ये ओमप्रकाश माथूर, संतोषकुमार गंगवार आदींचा समावेश आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांच्या जागी आता सी. पी. राधाकृष्णन यांची महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. आता ते लवकरच राज्यपालपदाची सूत्रे स्वीकारणार आहेत. पुढच्या काही महिन्यातच राज्यात विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. त्याआधाच राधाकृष्णन यांची महाराष्ट्राचे नवीन राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली. राधाकृष्णन हे दीर्घकाळापासून भाजपचे सदस्य आहेत. तामिळनाडूच्या कोईम्बतूर लोकसभा मतदारसंघातून ते दोनदा खासदार म्हणून निवडून आले होते. ते तामिळनाडूमध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष राहिले आहेत. १८ फेब्रुवारी २०२३ रोजी ते झारखंडचे राज्यपाल झाले होते. यासोबतच आसामचे राज्यपाल गुलाबचंद कटारिया यांची पंजाबचे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली. तसेच चंदीगडच्या केंद्रशासित प्रदेशाचे प्रशासक म्हणूनही त्यांची नियुक्ती करण्यात आली.
सिक्कीमचे राज्यपाल लक्ष्मण प्रसाद आचार्य यांची आसामच्या राज्यपालपदी नियुक्ती केली.
यांचीही राज्यपालपदी नियुक्ती
हरिभाऊ बागडे : राजस्थान
जिष्णूदेव वर्मा : तेलंगणा
ओमप्रकाश माथूर : सिक्कीम
संतोषकुमार गंगवार : झारखंड
रामेन डेका : छत्तीसगड
सी. एच. विजयशंकर : मेघालय