मनू भाकरचा डबल धमाका

yongistan
By - YNG ONLINE
ऐतिहासिक कामगिरी, दुहेरीत मिळाले कांस्यपदक
    पॅरिस : वृत्तसंस्था
पॅरिस  येथे सुरू असलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत आज चौथ्या दिवशी भारताला आणखी एक पदक मिळाले आहे. विशेष म्हणजे या ऑलिम्पिकमध्ये पहिले पदक मिळवून देणा-या मनू भाकरनेच मंगळवार, दि. ३० जुलै २०२४ रोजी १० मीटर एअर पिस्टल मिश्र दुहेरीत आणखी एक कांस्य पदक मिळवून दिले. सलग दुसरे कांस्य पदक जिंकून देत तिने भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला. एकाच ऑलिम्पिक स्पर्धेत २ पदके मिळविणारी पहिली भारतीय महिला ठरली. मिश्र दुहेरीत तिला सरबज्योत सिंगने मोलाची साथ दिली.  दरम्यान, २  ऑगस्ट रोजी मनू भाकर २५  मीटर एअर पिस्टल शुटिंगमध्ये सहभागी होणार आहे. त्यामुळे ती आणखी एक पद मिळवून देऊ शकते. 
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताने दुसरे पदक जिंकले. मनू भाकर आणि सरबज्योत सिंग या जोडीने दक्षिण कोरियाच्या ली वोंहो आणि ओ ये जिन या जोडीचा १६-१० असा पराभव करून कांस्यपदक जिंकले. १० मीटर एअर पिस्तूल मिश्र सांघिक स्पर्धेत भारताला हे पदक मिळाले. मनू भाकरचे हे दुसरे ऑलिम्पिक पदक आहे. मनू भाकरने याआधी २८ जुलैला पॅरिस ऑलिम्पिकच्या १० मीटर एअर पिस्टल सिंगल्स इवेंटमध्ये कांस्यपदक मिळविले होते. पॅरिसमध्ये मिळालेल्या पहिल्या यशानंतर ४८ तासातच तिने मिश्र दुहेरीत आणखी एक कांस्यपदक जिंकून देऊन इतिहास रचला.
कांस्यपदक स्पर्धेत कोरियाई जोडीसोबत मनू आणि सरबज्योतचा सामना सोपा नव्हता. या मॅचच्या सुरुवातीला कोरियाने पहिला सेट जिंकला. त्यानंतर सलग ५ सेट मनू आणि सरबज्योतने जिंकले. कोरियाने पुन्हा मॅचमध्ये पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला. पण मनू आणि सरबज्योतच्या एकाग्रतेने प्रतिस्पर्ध्यांना यशस्वी होऊ दिले नाही. त्यामुळे हे यश मिळाले.