२०२३ चा हंगाम, प्रतिहेक्टरी ५ हजार मिळणार
मुंबई : प्रतिनिधी
सन २०२३ च्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतक-यांना अर्थसंकल्पात केलेल्या घोषणेप्रमाणे प्रतिहेक्टरी ५ हजार रुपये अर्थसहाय्य देण्याचा निर्णय सोमवार, दि. २९ जुलै रोजी कृषी विभागाने घेतला, अशी माहिती कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली. याबाबतचा शासन निर्णय कृषी विभागाने निर्गमित केला आहे.
२०२३ मध्ये बहुतांश भागात पावसाचे प्रमाण कमी त्याचबरोबर कापूस व सोयाबीनचे भाव पडल्याने शेतक-यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागले होते. या शेतक-यांना महायुती सरकारने अर्थसहाय्य देण्याची घोषणा लोकसभा निवडणुकीच्या आधी केली होती. त्याची अधिकृत घोषणाही नुकत्याच पार पडलेल्या अर्थसंकल्पातही केली होती. त्यानुसार आज शासन निर्णय जारी करण्यात आला. त्यामुळे लवकरच शासनाच्या घोषणेप्रमाणे शेतक-यांच्या खात्यात रक्कम जमा होणार आहे.
राज्यातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतक-यांना किमान १००० रुपये तर २ हेक्टरच्या मर्यादेत प्रतिहेक्टरी ५ हजार रुपये याप्रमाणे अर्थसहाय्य देण्यात येणार आहे. कापूस उत्पादक शेतक-यांसाठी एकूण १५४८ कोटी ३४ लाख रुपये इतका तर सोयाबीन उत्पादक शेतक-यांसाठी २६४६ कोटी ३४ लाख रुपये असा एकूण ४१९२ कोटी ६८ लाख रुपये निधीच्या खर्चास मान्यता देण्यात आली.