४ वर्षात १२ हजार लघु उद्योग बंद

yongistan
By - YNG ONLINE
 मुंबई : प्रतिनिधी
मागील ४ वर्षांत राज्यात सुरुवातीला महाविकास आघाडी आणि आता महायुतीचे सरकार आहे. या कालावधीत राज्यातील १२ हजार लघु उद्योग बंद झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाने संसदेत ही माहिती दिली. हे लघु उद्योग सुरू राहावेत, म्हणून सरकार पुढाकार घेत नाही का? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. 
  कुठल्याही राज्यातील उद्योगधंदे हे त्या राज्यातील तरुण-तरुणी यांच्या हाताला काम देतात, रोजगार देतात; परिणामी त्या राज्यातील बेकारी कमी होऊन तरुणांच्या हाताला रोजगार मिळतो. राज्यात लघु उद्योग किंवा उद्योग-धंद्यांमुळे कुठल्याही राज्यातील बेरोजगारीची टक्केवारी किंवा रोजगाराची टक्केवारी किती आहे हे कळते; मात्र कोरोनाच्या महामारीनंतर म्हणजेच महाविकास आघाडी सरकारमध्ये आणि महायुतीच्या सरकारमध्ये मागील चार वर्षांत राज्यातील १२ हजार लघुउद्योग बंद झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. जुलै २०२० ते जुलै २०२४ या ४ वर्षांत एकट्या महाराष्ट्रात १२ हजार लघु उद्योग बंद झाल्याची धक्कादायक माहिती सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाने संसदेत दिली.
राज्यात मागील अडीच वर्षांपासून महायुतीचे सरकार आहे. या अडीच वर्षांत राज्यातील अनेक उद्योगधंदे परराज्यात गेले. गुजरातमध्ये उद्योगधंदे पळवल्याची ओरड विरोधकांकडून होत आहे आणि हे सरकार गुजरातधार्जिने, महाराष्ट्रविरोधी असल्याची टीका विरोधकांकडून होत आहे; परंतु या अडीच वर्षातच नाही तर त्याआधीही म्हणजे महाविकास आघाडी सरकारच्या काळातही अनेक सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग बंद झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे राज्यातील लघुउद्योग बंद होण्यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकारची उदासीनता दिसून येत आहे. हे लघु उद्योग सुरू राहावेत, म्हणून मविआ किंवा महायुतीचे सरकार पुढाकार घेत नाही का, असा सवाल उपस्थित होत आहे.

५ लाख कामगारांवर बेरोजगारीची कु-हाड
राज्यातील १२ हजार बंद पडलेल्या लघु उद्योगांमध्ये महाराष्ट्रातील ५ लाख ४ हजारांवर कामगारांची संख्या होती. यांच्या हातून काम गेल्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. 

 देशात ४९ हजार 
लघुउद्योग बंद 
देशपातळीवर विचार केला तर गेल्या ४ वर्षांत संपूर्ण देशात ४९ हजार ३४२ सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग बंद पडलेले आहेत. या बंद पडलेल्या उद्योगधंद्यामुळे लाखो लोकांवर बेकारीची कु-हाड कोसळली आहे. या उद्योगधंद्यामुळे साडेतीन लाख लोकांना रोजगार मिळाला होता; परंतु उद्योग बंद झाल्याने कामगारांना मोठ्या प्रमाणात नोकरी गमवावी लागली. 
राज्यनिहाय आकडेवारी
देशभरात ४९ हजार ३४२ सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग बंद पडले. यामध्ये एकट्या महाराष्ट्रात १२, २३३ उद्योग बंद पडले. तसेच तामिळनाडूत ६ हजार २९८ लघुउद्योग, गुजरातमध्ये ४ हजार ८६१ सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग, राजस्थानमध्ये ३ हजार ८५७ उद्योगधंदे आणि उत्तर प्रदेशात ३ हजार ४२५ उद्योगधंदे बंद पडले आहेत.