-मुख्यमंत्री अन्नपुर्णा योजनेची व्याप्ती वाढवली
मुंबई : प्रतिनिधी
वर्षाला ३ मोफत गॅस सिलेंडर देणा-या मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची व्याप्ती सरकारने वाढवली असून पंतप्रधान उज्ज्वला योजनेतील ५२ लाख १६ हजार लाभार्थ्यांबरोबरच मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांना या योजनेचा लाभ दिला जाणार आहे. अन्न आणि नागरी पुरवठा विभागाने मंगळवारी या संदर्भातील शासन निर्णय जारी केला.
विधिमंडळ अधिवेशनात राज्याचा अतिरिक्त अर्थसंकल्प सादर करताना मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना घोषित केली होती. या योजनेनुसार राज्यातील पंतप्रधान उज्ज्वला योजनेतील ५२ लाख १६ हजार ४१२ पात्र लाभार्थ्यांना वर्षाला ३ गॅस सिलेंडर मोफत देण्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली होती. आता सरकारने मुख्यमंत्री अन्नपुर्णा योजनेत माझी लाडकी बहीण योजनेतील पात्र लाभार्थ्यांचा समावेश केला आहे त्यामुळे लाभार्थी महिलांची संख्या वाढणार आहे.
या योजनेसाठी अन्न आणि नागरी पुरवठा विभागाने पात्र लाभार्थ्यांचे निकष तसेच कार्यपद्धती निश्चित केली आहे. महिलांच्या नावे गॅस जोडणी असणा-या लाभार्थ्याला या योजनेचा लाभ मिळेल तसेच एका कुटुंबात केवळ एकच लाभार्थी योजनेस पात्र असणार आहे. याशिवाय एका महिन्यात एकापेक्षा अधिक गॅस सिलेंडर मिळणार नाहीत, असे शासन निर्णयात स्पष्ट करण्यात आले आहे. हा लाभ केवळ १४.२ किलोग्रॅम वजनाच्या गॅस सिलेंडरची जोडणी असलेल्या गॅसधारकांना मिळेल. पंतप्रधान उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना गॅस सिलेंडरचे नियमित वितरण हे तेल कंपन्यांमार्फत करण्यात येते. मुख्यमंत्री अन्नपुर्णा योजनेंतर्गत द्यावयाच्या ३ मोफत सिलेंडरचे वितरणही तेल कंपन्यांमार्फत करण्यात येईल, असे शासन निर्णयात नमूद केले आहे.