देशात राजकीय असंतोषाचे जनक तथा आधुनिक भारताचे एक शिल्पकार म्हणून लोकमान्य टिळक यांची ओळख आहे. ‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळविणारच’ अशी सिंहगर्जना करणा-या टिळकांनी आपले संपूर्ण आयुष्य भारताच्या स्वातंत्र्य प्राप्तीसाठी ब्रिटिशांशी लढा दिला. कुशाग्र बुद्धीमत्तेचे, प्रखर देशभक्त, निर्भीड पत्रकार, लेखक आणि स्पष्टवक्ते असण-या, अन्यायाविरुद्ध पेटून उठणा-या टिळकांनी शिवजयंती आणि गणेशोत्सव सुरू केला आणि लोकांमध्ये सांस्कृतिक राष्ट्रवाद निर्माण केला. ब्रिटिशांनी ‘भारतीय असंतोषाचे जनक’ असे बिरुद दिलेल्या टिळकांनी भारताच्या स्वातंत्र्यासाठी आणि उत्कर्षासाठी ‘शिक्षण’ ही मूलभूत गरज मानून ‘केसरी’ आणि ‘मराठा’ ही वृत्तपत्रे सुरु करून लोकांना संघटित आणि शिक्षित केले तर ‘न्यू इंग्लिश स्कूल’ची स्थापना करून तरुणांना देशप्रेमाची शिकवण दिली. स्वदेशी, बहिष्कार, शिक्षण आणि स्वराज्य या चतु:सूत्रीचा टिळकांनी नेहमीच पुरस्कार केला. त्यांची २३ जुलैला जयंती आहे.
२३ जुलै १८५६ मध्ये रत्नागिरी येथे लोकमान्यांचा जन्म झाला. लहानपणापासूनच कुशाग्र बुद्धिमत्ता असलेल्या टिळकांचे विचार स्वतंत्र आणि वेगळे होते. गणित हा त्यांचा आवडता विषय होता. किती तरी कठीण गणिते ते सहजपणे सोडवत. तथापि, स्पष्टवक्तेपणामुळे शिक्षकांना ते आवडत नसत. प्रकृतीने अशक्त असणा-या टिळकांनी महाविद्यालयात प्रवेश घेतल्यानंतर नियमित व्यायाम आणि पौष्टिक आहार घेऊन प्रकृती बळकट केली आणि सर्व खेळांत प्रथम क्रमांक पटकावला. ते उत्तम मल्ल आणि पोहणारे म्हणून नावाजले गेले. १८७७ मध्ये टिळक गणितात प्रथम वर्गामध्ये बी.ए. झाले. पुढे त्यांनी एल.एल.बी. ही पदवी संपादन केली.
तथापि नोकरी न करता आगरकरांच्या सहकार्याने १८८० मध्ये ‘न्यू इंग्लिश स्कूल’ची स्थापना केली. लोकांना संघटित करून इंग्रजांच्या अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी त्यांना तयार केले. बालविवाहाला विरोध, विधवाविवाह आदी सामाजिक सुधारणांसाठी त्यांनी ब्रिटीश सरकारविरुद्ध संघर्ष केला. नंतर दोघांमध्ये तात्त्विक मतभेद झाल्याने टिळकांनी कर्जासह केसरीचे संपादकपद स्वत:कडे घेतले. टिळकांचे अग्रलेख हाच केसरीचा आत्मा होता. सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय, उजाडले पण सूर्य कुठे आहे, टिळक सुटले पुढे काय, प्रिन्सिपॉल, शिशुपाल की पशुपाल, टोणग्याचे आचळ, हे आमचे गुरूच नव्हेत’, बादशहा ब्राह्मण झाले, ‘पुनश्च हरि ॐ!’ हे त्यांचे काही प्रसिद्ध अग्रलेख.
टिळक हे सुरवातीपासूनच जहालमतवादी असल्याने त्यांनी १८९० मध्ये काँग्रेसमध्ये प्रवेश करताच पक्षाच्या मवाळ विचारसरणीला विरोध केला. काँग्रेस पक्षातील लाला लजपतराय, आणि बिपिनचंद्र पाल यांची राजकीय मते त्यांच्याशी जुळणारी होती. यामुळे या त्रिकुटाला लाल-बाल-पाल असे नामकरण मिळाले व पुढे हे त्रिकुट देशाच्या राजकारणात बरेच गाजले. मंडालेच्या तुरुंगात असताना त्यांनी लिहिलेला ‘गीतारहस्य’ हा ग्रंथ अक्षय विचारधन असून त्यात त्यांनी ज्या कर्मयोगाचा पुरस्कार केला.
गणिताचा व्यासंग
टिळकांना गणित विषयापैकी बीजभूमिती हा विषय विशेष आवडे. त्यांची अभ्यास करण्याची पद्धती अनालीटीकल म्हणजेच विवेचक बुद्धीची असे, केवळ पुस्तकातील विवेचनाने संतुष्ट न होता, स्वत: विषयाचे उभे-आडवे विभाग पाडून स्वत:ची बुद्धी चालवून ते त्या विषयाची काहीतरी नवीन मांडणी करीत.
लोकमान्य टिळकांचे प्रेरणादायी विचार
१) स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच : बाळ गंगाधर टिळक
२) महान कार्ये कधीही सोपे नसतात आणि सहज होणारे कार्ये महान नसतात : बाळ गंगाधर टिळक
३) माणूस स्वभावाने कितीही चांगला असला तरीही शिक्षणाने त्याचा विकास झाल्याशिवाय देशाची उन्नती होऊ शकत नाही : बाळ गंगाधर टिळक
४) जुलूम सहन करणे म्हणजे सोशिकपणा नव्हे तो परमार्थही नव्हे ती फक्त पशुवृत्ती होय : बाळ गंगाधर टिळक
५) तुम्ही आपल्या कर्माचा पडदा काचेसारखा स्वच्छ कराल तर त्यातून तुम्हाला परमेश्वर दिसेल. गोणपाटासारखा कराल, तर त्यातून परमेश्वर कसा दिसेल : बाळ गंगाधर टिळक
६) समोर अंधार असला तरी त्या पलिकडे उजेड आहे हे लक्षात ठेवा : बाळ गंगाधर टिळक
७) फक्त जेव्हा लोखंड गरम असेल तेव्हाच त्याच्यावर प्रहार करा. तुम्हाला निश्चितच यश मिळेल : बाळ गंगाधर टिळक
८) कर्तव्य मार्गावर गुलाब-पाणी शिंपडले जात नाही किंवा त्यात गुलाबही उगवत नाहीत : बाळ गंगाधर टिळक