गट ब, गट क च्या जागा एमपीएससीतर्फ भरणार

yongistan
By - YNG ONLINE
शासन निर्णय जारी, परीक्षार्थींना दिलासा
 
मुंबई : प्रतिनिधी
राज्य शासनाच्या अखत्यारीतील सर्व शासकीय कार्यालयातील गट ब  अराजपत्रित व गट क (वाहन चालक वगळून) संवर्गातील सर्व पदे एमपीएससी मार्फत भरली जाणार आहेत.  विद्यार्थ्यांच्या मागणीची दखल घेत राज्य सरकारने गुरुवार, दि. १८ जुलै २०२४ रोजी शासन निर्णय जारी केला. त्यामुळे नोकर भरतीसाठी परिश्रम घेणा-या विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. 
या संवर्गातील पदे टप्प्याटप्प्याने एमपीएससीच्या कक्षेत आणण्यात येतील. यासाठी राज्य सरकारने पाच सदस्यीय समिती नेमली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेतदेखील गट क प्रवर्गातील पदे टप्प्याटप्प्याने महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे भरली जातील, अशी घोषणा केली होती.  
महाराष्ट्र सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाकडून गट-ब आणि गट-क प्रवर्गातील पदांची भरती प्रक्रिया टप्प्याटप्प्याने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे देण्याचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. नोकरभरतीची तयारी करणा-या विद्यार्थ्यांच्या मागणीची दखल राज्य सरकारने घेतली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून विद्यार्थ्यांनी ही मागणी केली होती.  गट ब आणि गट क संवर्गातील पदे भरताना परीक्षांमध्ये अनेक वेळा गैरप्रकार आणि पेपरफुटीची प्रकरण समोर येत होती. यावेळी वारंवार या सर्व परीक्षा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेतल्या जाव्यात, अशा प्रकारची मागणी  स्पर्धा परीक्षांची तयारी करणा-या विद्यार्थ्यांकडून केली जात होती.  या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने हा मोठा निर्णय घेतला आहे.
सध्याची प्रक्रिया खासगी कंपन्यांमार्फतच
आतापर्यंत  ज्या संवर्गातील पदे  टीसीएस आणि आयबीपीएस या कंपन्यांशी राज्य शासनाने करार करून  त्यांच्यामार्फत ही पद भरती प्रक्रिया राबवली जात होती. त्यांच्याशी झालेल्या कराराची मुदत २०२५ पर्यंत होती. मात्र, शासनाने याबाबत निर्णय घेतला असून आता ही पदे एमपीएससीतर्फे भरली जाणार असल्याने विद्यार्थ्यांनी याचे स्वागत केले आहे.