भारतीय हॉकीने पटकावले कांस्य पदक

yongistan
By - YNG ONLINE

पदकांचा चौकार, श्रीयशला पदक समर्पित

पॅरिस : वृत्तसंस्था
पॅरिस ऑलिम्पिकमधील हॉकीच्या उपांत्य फेरीपर्यंत भारतीय हॉकी संघ पोहोचला होता. मात्र, त्यांना अंतिम फेरीत धडक मारता आली नाही. त्यामुळे कांस्य पदकाची संधी मिळाली. या संधीचे सोने करीत भारताने स्पेनविरुद्ध २-१ असा दमदार विजय मिळवित सलग दुसरे कांस्य पदक पटकावले. मागच्या वेळी टोकियो ऑलिम्पिकमध्येही भारताने कांस्यपदक पटकावले होते. 
भारताने हॉकीच्या कांस्य पदकाच्या लढतीत आज स्पेनला कडवी झुंज दिली. स्पेनने सामन्याच्या १८ व्या मिनिटाला गोल केला होता. त्यामुळे त्यांनी १-० अशी आघाडी घेतली होती. पण भारतानेही हार मानली नाही. दुसरे सत्र संपायला फक्त ४८ सेकंद शिल्लक असताना भारताने पेनल्टी कॉर्नरवर गोल केला आणि सामन्यात १-१ अशी बरोबरी केली. भारताने त्यानंतर पेनेल्टी कॉर्नरवर ३३ व्या मिनिटाला पुन्हा एकदा गोल केला आणि भारताने २-१ अशी आघाडी घेतली. ही आघाडी भारताने तिस-या सत्रातही कायम ठेवली. तसेच चौथ्या सत्रातही भारताने दमदार कामगिरी केली.
पहिल्या सत्रात भारत आणि स्पेन दोघांनाही गोल करता आला नाही. पण दुस-या सत्रातील १८ व्या मिनिटाला भारतीय खेळाडूंच्या चुकीमुळे स्पेनला पेनल्टी स्ट्रोक देण्यात आला. स्पेनने या सुवर्णसंधीचा चांगलाच फायदा उचलला आणि त्यांनी गोल केला. त्यामुळे स्पेनने सामन्याच्या १८ व्या मिनिटाला १-० अशी आघाडी घेता आली. त्यानंतर भारताने कमबॅक करीत स्पेनवर पकड निर्माण करीत बाजी मारली. परंतु अखेरच्या क्षणापर्यंत स्पेनची झुंज कायम होती. मात्र पकड कायम ठेवत भारताने कांस्य पदकावर शिक्कामोर्तब झाले. कांस्य पदकाच्या लढतीत यावेळी सर्वांच्या आशा गोलरक्षक पीआर श्रीजेश आणि हरमनप्रीत सिंग या दोघांवर होत्या. कारण श्रीजेशचा हा अखेरचा सामना होता तर हरमनप्रीत चांगल्या फॉर्मात होता. अखेर श्रीजेशनेच भारताला विजय प्राप्त करून दिला. पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी खेळाडूंना बक्षिसे जाहीर केली. भगवंत मान यांनी कांस्यपदक विजेत्या संघातील सर्व खेळाडूंना प्रत्येकी एक कोटी रुपयांचे प्रोत्साहनपर बक्षीस जाहीर केले.

पदक श्रीजेशला समर्पित
भारताचा कर्णधार हरमनप्रीत सिंगने दोन गोल करत आज भारताला विजय मिळवून दिला. त्यानंतर त्याने  हे कांस्यपदक श्रीजेशला समर्पित केल्याचे सांगितले. श्रीजेशचा हा अखेरचा सामना होता. या सामन्यात त्याने दमदार कामगिरी केली. त्यामुळे श्रीजेश या पदकाचा खरा हकदार आहे, असे सांगत हरमनप्रीतने हे पदक श्रीजेशला समर्पित केले. संपूर्ण संघाची हीच भावना असल्याचेही तो म्हणाला.

५२ वर्षांच्या इतिहासाची पुनरावृत्ती
भारतीय हॉकी संघाने ५२ वर्षांनंतर ऑलिम्पिकमध्ये सलग २ पदके जिंकली आहेत. यापूर्वी १९६८ ते १९७२ पर्यंत भारताने हॉकीमध्ये सलग ४ पदके जिंकली होती. त्यानंतर १९७६ च्या ऑलिम्पिकमध्ये देशाला एकही पदक मिळाले नाही. त्यानंतर १९८० मध्ये सुवर्णपदक जिंकले. मात्र, त्यानंतर पदकासाठी मोठी प्रतीक्षा करावी लागली. अखेर ४० वर्षांनंतर पदकाचा दुष्काळ संपला आणि भारतीय हॉकी संघाने मागच्या वेळी टोकियो ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक पटकावले. त्यानंतर २०२४ मध्ये हरमनप्रीत सिंगच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने पॅरिस ऑलिम्पिकमध्येही कांस्यपदक जिंकून ५२ वर्षांनंतर इतिहास घडवला. १९७२ नंतर भारताने हॉकीमध्ये सलग दोन पदके जिंकली. १९६८ आणि १९७२ मध्येही भारताने सलग दोन कांस्यपदके जिंकली होती. त्याची पुनरावृत्ती ५२ वर्षांनी झाली.