दारोदारी जाऊन योजनांचा प्रचार, ३०० कोटी खर्च करणार
मुंबई : प्रतिनिधी
राज्यात ५० हजार योजनादुतांची नियुक्ती करण्यात येणार आहे. दारोदारी जाऊन सरकारी योजनांचा प्रचार करण्यासाठी या योजनादुतांची नियुक्ती करण्यात येणार आहे, अशी माहिती शुक्रवार, दि. ९ ऑगस्ट २०२४ रोजी दिली. यासाठी सरकारी तिजोरीतून ३०० कोटी रुपयांचा खर्च करण्यात येणार आहे. दरम्यान, या नियुक्त्या ६ महिन्यांसाठी करण्यात येणार आहेत. यासाठी प्रत्येकाला १० हजार रुपयांचे मानधन देण्यात येणार आहे.
ग्रामीण भागात प्रत्येक ग्रामपंचायतीसाठी एका योजनादुताची नियुक्ती करण्यात येणार आहे तर शहरी भागात ५ हजार लोकसंख्येच्या मागे एक योजनादूत अशा प्रकारे ५० हजार योजनादुतांची निवड करण्यात येणार आहे. त्यासाठी १८ ते ३५ वयोगटातील पदवीधर उमेदवारांची निवड करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
महाराष्ट्र सरकारच्या कौशल्य रोजगार आणि उद्योजकता या विभागामार्फत मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजनेच्या माध्यमातून मुख्यमंत्री योजनादूत कार्यक्रमाची राज्यात अंमलबजावणी होणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्य सरकारने याबाबत मोठा निर्णय घेतला आहे. दरम्यान, यासाठी ऑनलाइन अर्ज प्राप्त झाल्यानंतर प्रत्येक अर्जाची छाननी होणार आहे. त्यानंतर जिल्हा माहिती अधिकारी यासंदर्भात सदरील उमेदवाराची नेमणूक करणार आहेत. भरती प्रक्रिया संदर्भात तारीख अद्याप निश्चित झालेली नाही. प्रत्येक जिल्हा स्तरावर समन्वय राखण्यासाठी १ नोडल अधिकारी नियुक्त केला जाणार आहे, असेही सांगण्यात आले.