थोर भारतीय नेते व अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे एक संस्थापक. १० नोव्हेंबर १८४८ रोजी त्यांचा कलकत्ता येथे जन्म झाला. वडील दुर्गाचरण डॉक्टर होते. सुरेंद्रनाथांचे प्राथमिक व उच्च शिक्षण कलकत्त्यातच झाले. बी. ए. झाल्यानतंर (१८६८) इंग्लंडला जाऊन ते आय. सी. एस. परीक्षा उत्तीर्ण झाले (१८६९). भारतात परतल्यावर त्यांची सहाय्यक दंडाधिकारी म्हणून सिल्हेटला नियुक्ती झाली; पण त्यांच्या प्रशासनातील किरकोळ चुकांचा बाऊ करून ब्रिटिश सरकारने त्यांना नोकरीवरून काढले (१८७४).
ब्रिटिश राज्यकर्त्यांच्या अशा अन्याय्य धोरणामुळेच त्यांच्याविरुद्ध जनमत जागृत करण्याची चळवळ त्यांनी हाती घेतली (१८७५). जनजागृतीसाठी त्यांनी ‘बेंगॉली’ हे इंग्रजी वृत्तपत्र काढले (१८७८). त्यातून त्यांनी ५० वर्षे सातत्याने लेखन केले.शिखांचा इतिहास तसेच भारतीय एकात्मता यांसारखे विषय हाताळून राष्ट्रीय जागृती करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. त्यांच्या वक्तृत्वाचा तत्कालीन बंगाली तरुणांवर व विशेषत: ब्राह्मोसमाजातील अनुयायांवर एवढा परिणाम झाला, की ते सुरेंद्रनाथांच्या चळवळीत सहभागी होऊ लागले. सुरेंद्रनाथांनी इंडियन असोसिएशन ही संस्था स्थापन केली (२६ जुलै १८७६) आणि तिच्या प्रसारार्थ भारतभर दौरा काढला. सुरेंद्रनाथांनी इंडिया असोसिएशनतर्फे राष्ट्रीय सभा कलकत्त्यात बोलवली (डिसेंबर १८८३).
यानंतर दुसरी सभा १८८५ मध्ये कलकत्त्यातच घेण्यात आली. राष्ट्रीय काँग्रेसचे ते दोनदा अध्यक्ष झाले. सुरुवातीपासून ते मवाळ पक्षात होते; बंगालच्या फाळणीला त्यांनी कडाडून विरोध केला (१९०५) आणि बहिष्काराचा जोरदार पुरस्कार केला. सुरेंद्रनाथांना लो. टिळकांचा जहालवाद किंवा गांधींचा असहकार हे दोन्ही मार्ग मान्य नव्हते. द्विदल राज्यपद्धती असलेल्या बंगालच्या विधिमंडळावर त्यांची नियुक्ती झाली (१९२१) व लवकरच त्यांना ब्रिटिश सरकारने किताब बहाल केला. बराकपूर येथे त्यांचे निधन झाले.