८.१५ सेकंदात पूर्ण केले ३ हजार मीटरचे अंतर
पॅरिस : वृत्तसंस्था
बीड जिल्ह्याचा सुपुत्र अविनाश साबळे याने सोमवार, दि. ५ ऑगस्ट २०२४ रोजी पॅरिस ऑलिम्पिकमधील अॅथलेटिक्समधील ३००० मीटर स्टीपलचेस प्रकारात फायनल गाठली. ऑलिम्पिकमध्ये स्टीपलचेसमध्ये अंतिम फेरीत पोहोचणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरला. त्याच्या माध्यमातून आणखी एक पदक पक्के होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ७ ऑगस्ट रोजी अंतिम फेरी होणार आहे.
या प्रकारत दोन विभाग असतात. या दोन्ही विभागात जे खेळाडू अव्वल पाच खेळाडूंमध्ये असतात, त्यांना फायनलमध्ये खेळण्याची संधी मिळते. अविनाश दुस-या गटात होता. या स्पर्धेत सुरुवातीला अविनाशने चांगली आघाडी घेतली. तो सुरुवातीला आघाडीवर तर काही वेळात तो दुस-या स्थानावर होता. परंतु त्याने आघाडी गमावली. तथापि, त्यानंतर आपल्या स्थानाची घसरण होऊ दिली नाही. अविनाशने पाचवे स्थान पटकावत फायनलमध्ये एंट्री केली.
अविनाश साबळे हा महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील रहिवासी असून तो सध्या भारतीय सैन्य दलात कार्यरत आहे. त्याने नियोजनबद्ध रितीने आपला खेळ केला. त्याने ८ मिनिटे १५.४० सेकंदात पात्रता फेरी पूर्ण करून अंतिम फेरीत प्रवेश केला. आता जी ऊर्जा राखून ठेवली आहे, ती अंतिम फेरीत बाहेर काढून पूर्ण ताकदीने मैदानात उतरणार आहे. देशाला माझ्यावर गौरव वाटेल, अशी कामगिरी करू, असे साबळे म्हणाला.