हिंसाचाराचा भडका, पंतप्रधान शेख हसिनांचा राजीनामा, सत्ता लष्कराच्या ताब्यात
ढाका : वृत्तसंस्था
नोकरीतील आरक्षणाच्या मुद्यावरून सुरू झालेल्या आंदोलनाने बांगला देशात उग्र रूप धारण केले आहे. देशात हिंसाचाराचा आगडोंब उसळल्याने सोमवार, दि. ५ ऑगस्ट २०२४ रोजी पंतप्रधान शेख हसीना यांच्यावर राजीनाम्याचा दबाव वाढला. त्यावर बांगला देशचे लष्कर प्रमुख वकार-उज-जमान यांनी शेख हसिना यांना राजीनामा देण्यास सांगितले. त्यावेली हसिना यांनी काही वेळातच पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर त्यांनी भारतात आश्रय घेतला. त्यांनी सरकारी निवासस्थान सोडताच आंदोलकांनी त्यांच्या घराचा ताबा घेतला आणि साहित्याची तोडफोड करीत लूट केली.
बांगला देशात आरक्षणाच्या मुद्यावरून आंदोलन भडकले. त्यानंतर आंदोलक आणि सत्ताधारी पार्टीच्या समर्थकांमध्ये चांगलीच जुंपली. त्यामुळे हिंसाचारात १४ पोलिसांसह १०० जणांचा मृत्यू झाला. तसेच शेकडो जखमी झाले. त्यात ३०० पोलिसांचा समावेश आहे. या प्रकरणी ११ हजार लोकांना अटक केली आहे. सध्या परिस्थिती नियंत्रणाबाहेर असून, देशात तात्काळ कर्फ्यू लावावा लागला. तसेच इंटरनेटही बंद करण्यात आले आहे. आता देशातील सत्ता सध्या लष्कराने ताब्यात घेतली असून, लष्कराकडून पुढील २४ तासांत अंतरिम सरकार स्थापन केले जाईल, असे आश्वासन देण्यात आले.
बांगला देशाचे लष्कर प्रमुख जमान यांनी सोमवारी दुपारी पत्रकार परिषदेत हसीना यांना सत्तेतून बाहेर होण्याचा सल्ला दिला. या दरम्यान पंतप्रधान हसिना यांच्या मुलाने सुरक्षा दलाने कोणत्याही लोकनियुक्त सरकारला सत्तेत येण्यापासून रोखण्याचा आग्रह केला. लष्कराने हसिना यांना राजीनामा देण्यास फक्त ४५ मिनिटांचा वेळ दिला होता. देशात हिंसाचाराचा आगडोंब उसळल्याने १०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला तर अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात जाळपोळ करण्यात आली. मोठ्या शहरात लाखोंच्या संख्येने नागरिक रस्त्यावर उतरले. राजधानी ढाका शहरावरही आंदोलकांनी नियंत्रण मिळवले. पोलिस स्टेशन, सत्तारुढ पक्षाचे कार्यालय आणि त्यांच्या नेत्यांच्या घरावर हल्ले केले. अनेक वाहने जाळली. त्यानंतर सरकारने मेटा प्लेटफॉर्म फेसबुक, मॅसेंजर, व्हाट्सअॅप आणि इंस्टाग्राम बंद करण्याचे आदेश दिले.
पंतप्रधानांच्या घरावर ताबा
पंतप्रधान शेख हसिना शासकीय घर सोडून जाताच आंदोलकांनी थेट त्यांच्या सरकारी निवासस्थानी घुसून त्यांच्या निवासस्थानाचा ताबा मिळविला आणि हुल्लडबाजी सुरू केली. ढाका पॅलेसमध्ये घुसून शेख मुजीब उर रहमान यांचा पुतळा तोडला. तसेच पंतप्रधानांच्या निवासस्थानातील साहित्याची लुटालूट केली.
लष्कर अंतरिम सरकार स्थापन करणार
शेख हसीना यांच्या राजीनाम्यानंतर आता पुढील ४८ तासांत अंतरिम सरकार स्थापन करण्यात येईल, असे लष्कर प्रमुख वकार-उर-झमान यांनी सांगितले. त्यामुळे देशात आता अंतरिम सरकार स्थापन होऊ शकते.
शेख हसिना भारतात
बांगला देश लष्कराचे विमान सोमवारी दुपारी २.३० च्या सुमारास बंगभवन येथून शेख हसिना आणि त्यांची धाकडी बहीण शेख रेहाना यांच्यासह थेट भारतात दाखल झाले आणि ते गाजियाबादमधील हिंडेन एअरबेसवर लँड झाले.
खालिदा झिया तुरुंगाबाहेर?
एकीकडे पंतप्रधान शेख हसिना यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिल्यानंतर थेट राष्ट्रपती मोहमद शहाबुद्दीन यांनी विरोधी पक्षांच्या सदस्यांसोबत झालेल्या बैठकीत माजी पंतप्रधान खालिदा झिया यांची तुरुंगातून सुटका करण्याचा आदेश दिला. खालिदा झिया या बांगला देश नॅशनालिस्ट पार्टीच्या अध्यक्षा आहेत. त्या शेख हसिना यांच्या कट्टर विरोधक मानल्या जातात.