महिला टेनिसचा संघ उपांत्यपूर्व फेरीत

yongistan
By - YNG ONLINE
पॅरिस : वृत्तसंस्था 
श्रीजा अकुला, अर्चना कामथ आणि मनिका बत्रा यांच्या महिला टेबल टेनिस संघाने सोमवार, दि. ५ ऑगस्ट २०२४ रोजी रोमानियाचा पराभव करून महिला सांघिक स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. या स्पर्धेत श्रीजा, अर्चना आणि मनिका यांच्या संघाने चमकदार कामगिरी करत रोमानियाचा पराभव केला. या रोमांचक सामन्यात जागतिक क्रमवारीत ११व्या क्रमांकावर असलेल्या भारताने चौथ्या क्रमांकाचा संघ रोमानियाचा ३-२ असा पराभव केला.
श्रीजा आणि अर्चना या भारतीय जोडीने सलामीच्या लढतीत रोमानियाच्या एडिना आणि समारा जोडीचा ३-० असा पराभव करून आघाडी घेतली. त्यानंतर एडिना आणि समारा यांचा ११-९, १२-१०, ११-७ अशा फरकाने पराभव केला. यानंतर मनिकाने पुढच्या सामन्यात प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी बर्नाडेटचा ३-० असा सहज पराभव केला. 

सेनने रचला इतिहास मात्र, पदक हुकले
लक्ष्य सेनने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये इतिहास रचला, पण कांस्यपदकाने त्याला हुलकावणी दिली. लक्ष्य सेनपुढे मलेशियाच्या ली झी जिआचे आव्हान होते. त्याला हे आव्हान पेलता आले नाही. कांस्यपदकाच्या लढतीत भारताच्या लक्ष्य सेनने पहिला गेम २१-१३ असा जिंकला. परंतु त्याने दुसरा आणि तिसराही गेम गमावला. त्यामुळे पदक हुकले. मात्र, ऑलिम्पिकच्या इतिहासात उपांत्य फेरीत पोहोचलेला भारताचा तो पहिला पुरुष बॅडमिंटनपटू ठरला. 
 
निशा दहियाला धक्का
महिलांच्या कुस्तीमध्ये पदक निश्चित करण्यासाठी निशा दहियाने ८-१ अशी आघाडी घेतली. पण अखेरच्या अर्ध्या सेकंदात तिचा खांदा दुखावला. त्यामुळे तिला पराभवाचा सामना करावा लागला. भारताच्या निशा दहियाने महिलांच्या ६८ किलो वजनी गटात नेत्रदीपक सुरुवात केली. उत्तर कोरियाच्या पाक सोल गमला निशा सहज हरवणार, असे वाटत होते. त्यानंतर निशाला एक गुण गमवावा लागला, तरीही ती ८-२ अशा आघाडीवर होती. पण अखेरच्या अर्ध्या सेकंदात सर्व गेम पलटला.