इस्लामाबाद : वृत्तसंस्था
पाकिस्तानमधील अर्थव्यवस्थेबाबत आंतरराष्ट्रीय समुदायाने अनेकदा चिंता व्यक्त केली. पाकिस्तानला आर्थिक आधार मिळावा, यासाठी आंतरराष्ट्रीय संस्थांकडून मोठ्या प्रमाणावर कर्जाच्या स्वरुपात रक्कम व आर्थिक मदतही पाकिस्तानने घेतली आहे. या पार्श्वभूमीवर पाकिस्तानच्या केंद्रीय बँकेने एक मोठा निर्णय घेतला आहे. पाकिस्तानमध्ये आता पॉलिमर प्लास्टिकच्या नोटा चलनात आणण्याची घोषणा स्टेट बँक ऑफ पाकिस्तानचे गव्हर्नर जमील अहमद यांनी केली.
सध्या अर्थव्यवस्थेत वापरात असणा-या कागदाच्या नोटासाठीचा नवा पर्याय तयार केला जात असून त्यामध्ये सुरक्षेसंदर्भातल्या अनेक गोष्टींचा अंतर्भाव केला जाणार आहे. या वर्षी डिसेंबर महिन्याच्या आत या नोटा बाजारात येतील, असेही त्यांनी सांगितले.
५००० रुपयांचीही नोट
पॉलिमर प्लास्टिकचा वापर करून बनवण्यात येणा-या नोटांमध्ये ५००० रुपयांच्या नोटेचाही समावेश असेल, असे सांगितले जात आहे. या नोटा प्रामुख्याने १०, ५०, १००, ५००, १००० आणि ५००० अशा मूल्याच्या असतील, असेही सांगण्यात आले.
जुन्या कागदी नोटा
५ वर्षेच चलनात
जुन्या कागदी नोटा पुढची पाच वर्षे चलनात राहतील. तोपर्यंत त्या टप्प्याटप्प्याने अर्थव्यवस्थेतून बाद करण्याची प्रक्रिया चालू राहील, अशी माहितीही जमील अहमद यांनी दिली.
सध्या ४० देशांत
प्लास्टिकच्या नोटा
सध्या जगभरातील जवळपास ४० देश राष्ट्रीय चलन म्हणून पॉलिमर प्लास्टिकच्या नोटांचा वापर करीत आहेत. यामध्ये ऑस्ट्रेलियात १९९८ मध्ये पहिल्यांदा पॉलिमार नोटा सुरु करण्यात आल्या होत्या. या प्रकारच्या नोटांच्या नकली नोटा बनवणे कठीण असून त्यात होलोग्राम व इतर सुरक्षेच्या उपाययोजना अधिक सक्षम असल्याचे मानले जाते.