पॅरिस : वृत्तसंस्था
भारतीय पैलवान अमन सेहरावतने शुक्रवार, दि. ९ ऑगस्ट २०२४ रोजी पॅरिस ऑलिम्पिकमध्ये बाजी मारत ५७ किलो वजन गटात कांस्यपदक पटकावले. भारताच्या अमन सेहरावतने प्युर्टो रिकोच्या डॅरियन क्रूजवर १३-५ ने विजय मिळवल. भारताचे हे या ऑलिम्पिकमधील सहावे मेडल आहे. भारताने मागील ४ ऑलिम्पिकपासून कुस्ती क्रीडा प्रकारात मेडल जिंकण्याची परंपरा कायम ठेवली आहे. भारतीय पैलवान २००८ पासून २०२४ पर्यंत प्रत्येक ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकत आले आहेत.
अमन सेहरावतने पहिल्या फेरीत ६-३ अशी आघाडी घेतली होती. या सामन्यात त्याने दमदार सुरुवात केली. या लढतीत त्याने सुरुवातीपासूनच आपला दबादबा ठेवला. प्रतिस्पर्धी पैलवानाला मोठी आघाडी घेण्याची संधीच दिली नाही. अमनने पहिल्या फेरीत उत्तम बचाव करत गुण मिळवले. सुरुवातीपासून अतिशय सावधानतेने डाव टाकत प्रतिस्पर्ध्यावर पकड निर्माण करीत त्याने कांस्य पदक पटकावले. पॅरिस ऑलिम्पिकमधील भारताचे हे सहावे पदक आहे.
यामध्ये नेमबाजीत ३, हॉकी, भालाफेक आणि आता कुस्तीत प्रत्येकी एक पदक पटकावले. नेमबाजीत मनू भाकर (१० मीटर एअर रायफल), मनू भाकर आणि सरबज्योत सिंग (१० मीटर एअर रायफलमध्ये संयुक्त), स्वप्नील कुसाळे (५० मीटर रायफल) मध्ये पदक पटकावले. याशिवाय भारतीय पुरुष हॉकी संघाने कांस्यपदक आणि स्टार भालाफेकपटू निरज चोप्राने रौप्य पदक जिंकले आणि आज अमन सेहरावत यानेही कांस्य पदक पटकावले.
अमन सेहरावतची
उत्कृष्ट कामगिरी
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये अमन सेहरावतला उपांत्य फेरीत जपानच्या अव्वल मानांकित रेई हिगुचीकडून पराभव पत्करावा लागला होता. त्यामुळे त्याचे सुवर्ण पटकवण्याचे स्वप्न भंगले. हरियाणाच्या अमनने सुरुवातीच्या दोन्ही लढती जिंकल्या होत्या. प्री-क्वॉर्टर फायनलमध्ये माजी युरोपियन चॅम्पियन नॉर्थ मॅसेडोनियाच्या व्लादिमीर एगोरोव्हचा १०-० ने पराभव केला तर क्वॉर्टर फाइनलमध्ये अल्बेनियाच्या झेलीमखान अबाकारोव्हचा १२-० असा पराभव केला.