अपात्र ठरल्यानंतर मोठी घोषणा, संपूर्ण देश हळहळला
पॅरिस : वृत्तसंस्था
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये दमदार कामगिरी बजावात थेट अंतिम फेरीत धडक मारणा-या विनेश फोगटला केवळ १०० ग्रॅम जास्त वजनामुळे अंतिम सामन्याला मुकावे लागले. तिला थेट अपात्र घोषित केले. त्यामुळे तिच्यासह भारतीय क्रीडाप्रेमींना मोठा धक्का बसला. त्यामुळे निराश झालेल्या विनेशने दुस-याच दिवशी म्हणजे गुरुवार, दि. ८ ऑगस्ट २०२४ रोजी कुस्तीला अलविदा करण्याची घोषणा केली. त्यामुळे भारतीय क्रीडाप्रेमींना आणखी एक धक्का बसला.
विनेश फोगटने याबाबतची माहिती सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून दिली. आई कुस्ती माझ्याविरुद्ध जिंकली. मी जिंकावे, हे तुमचे स्वप्न होते. परंतु माझी हिंमत तुटली आहे. आता माझ्यात जास्त ताकद नाही. ‘अलविदा कुस्ती’ अशी भावूक पोस्ट लिहित तिने आपल्या निवृत्तीची घोषणा केली. त्यामुळे कुस्तीत विजयी घोडदौड करणारी विनेश भारताला सुवर्ण पदक मिळवून देणार, असे वाटत असतानाच तिला केवळ १०० ग्रॅम वजनामुळे अपात्र व्हावे लागले आणि काही वेळात भारतीयांच्या स्वप्नांचा अक्षरश: चुराडा झाला. त्यातच आता तिने यातून उभारी न घेता थेट निवृत्तीची घोषणा करून टाकली. त्यामुळे विनेशचे स्वप्न अधुरेच राहिले. यातून भारतीय क्रीडाप्रेमी हळहळला.
विनेश फोगटने तिच्या प्रतिस्पर्ध्याविरुद्ध उपान्त्य फेरीचा सामना ५-० च्या फरकाने जिंकला होता आणि ऑलिम्पिक अंतिम फेरीसाठी ती पात्र ठरणारी पहिली भारतीय महिला कुस्तीपटू ठरली होती. विनेश ५० किलो वजनी गटात खेळत होती. पहिल्या दिवशी विनेशचे वजन ४९.५ इतके भरले. मात्र, उपान्त्य फेरीची लढत संपली, तेव्हा बाहेर पडल्यावर विनेशचे वजन ५२ किलोपर्यंत वाढले होते. या वाढलेल्या वजनाने घात केला आणि तिची ऑलिम्पिक पदकाची कहाणी पुन्हा अपूर्ण राहिली.
विनेश फोगट अंतिम फेरीपर्यंत मजल मारेल, असे कुणालाच वाटले नव्हते. पण ती जिद्दीने लढली. तिने एकापाठोपाठ एक तीन सामने खेळले आणि मोठ्या थाटात अंतिम फेरी गाठली. उपांत्य फेरीचा सामना तर ५-० ने जिंकला. त्यावेळी विनेशची देहबोली सुवर्ण पदक जिंकण्याची होती. तिला लढायचे होते, पण रणांगणात येण्यापूर्वीच ती अपात्र ठरली.
विनेशच्या याचिकेवर
आज होणार सुनावणी
विनेश फोगटला जास्त वजनामुळे बुधवारी अपात्र ठरवण्यात आले होते. त्यामुळे तिचे पदक जिंकण्याचे स्वप्न हुकले होते. तसेच हक्काचे रौप्यपदक देखील गेले. ऑलिम्पिक समितीच्या या निर्णयाला भारताने आव्हान दिले आहे. भारतीय ऑलिम्पिक संघटनेने सीएएसकडे दाद मागितली होती. आता हा अर्ज स्वीकारण्यात आला असून, या याचिकेवरील सुनावणी उद्या ९ ऑगस्ट रोजी भारतीय वेळेनुसार सकाळी साडेअकरा वाजता होणार आहे.