मोहमद युनस यांच्यासह १५ सदस्यांनी घेतली शपथ
ढाका : वृत्तसंस्था
बांगलादेशात उसळलेल्या हिंसाचाराच्या घटनेनंतर शेख हसीना यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा देत देश सोडला. त्यानंतर बांगलादेशात राजकीय अस्थिरता निर्माण झाली होती. अखेर आज अंतरिम सरकार स्थापन झाले. नोबेल पारितोषिक विजेते मोहम्मद युनूस यांनी बांगलादेशच्या अंतरिम सरकारचे प्रमुख म्हणून ८ ऑगस्ट २०२४ रोजी शपथ घेतली. मोहम्मद युनूस यांच्यासह १५ सदस्यांनी पद व गोपनीयतेची शपथ घेतली.
बांगलादेशात अर्थतज्ज्ञ मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखाली अंतरिम सरकार स्थापन झाले आहे. आता बांगलादेशात उसळलेल्या हिंसाचाराच्या घटनानंतर देशात शांतता प्रस्थापित करण्याचे आव्हान मोहम्मद युनूस यांच्यासमोर आहे.
शेख हसीना यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा देत देशातून पलायन केल्यानंतर मोहम्मद युनूस यांनी देशाच्या कारभाराची सूत्रे आपल्या हातात घ्यावी, अशी मागणी बांगलादेशातील विद्यार्थी आंदोलकांकडून करण्यात आली होती. त्यावेळी मी सरकारचा सल्लागार म्हणून काम करेन, अशी ग्वाही त्यांनी दिली होती. त्यानंतर मोहम्मद युनूस हे परदेशातून बांगलादेशात परतले. आज त्यांनी अंतरिम सरकारचे प्रमुख म्हणून शपथ घेतली.
बांगलादेशमधील लष्कराने मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखालील अंतरीम सरकारला पूर्ण समर्थन देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, तरीही देशात निर्माण झालेल्या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर अनेक आघाड्यांवरील आव्हानांचा सामना मोहम्मद युनूस यांच्या अंतरीम सरकारला करावा लागणार आहे. त्यामुळे मोहम्मद युनूस यांच्यासाठी हे अंतरिम सरकार चालवणे आव्हानात्मक असणार आहे.
अंतरिम सरकारमधील
हे आहेत १४ सदस्य
-आसिफ महमूद सालेह उद्दीन अहमद (बांगला देश बँकेचे माजी गव्हर्नर)
-डॉ. आसिफ नजरुल (ढाका विद्यापीठाचे शिक्षक)
-आदिलुर रहमान खान (सचिव,अधिकार)
-एएफ हसन आरिफ (माजी सल्लागार)
-तौहीद हुसेन (माजी परराष्ट्र सचिव)
-ब्रती शर्मीन मुर्शिद (ब्रातीचे मुख्य कार्यकारी अधिकारी)
-नाहिद इस्लाम (भेदभाव विरोधी विद्यार्थी चळवळीचे समन्वयक)
-फरीदा अख्तर (कार्यकारी संचालक, विकास पर्याय संशोधन)
-खालिद हसन (हेफाजते इस्लाम बांगला देशचे माजी नायब अमीर)
-सय्यदा रिजवाना हसन (मुख्य कार्यकारी, बांगलादेश पर्यावरण वकील संघ)
-ब्रिगेडियर जनरल (निवृत्त) एम सखावत हुसेन (माजी निवडणूक आयुक्त)
-नूरजहाँ बेगम (ग्रामीण बँकेच्या माजी व्यवस्थापकीय संचालक)