कोलंबो : श्रीलंकेत अनुरा कुमार दिसानायके राष्ट्रपती झाल्यानंतर आता नव्या पंतप्रधानांनीही शपथ घेतली आहे. हरिणी अमरसूर्या यांनी मंगळवारी श्रीलंकेच्या नव्या पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. दरम्यान, सिरिमावो भंडारनायके यांच्यानंतर पंतप्रधान म्हणून हे पद भूषविणा-या हरिणी अमरसूर्या या देशातील दुस-या महिला नेत्या ठरल्या. नॅशनल पीपल्स पॉवरच्या ५४ वर्षीय नेत्या हरिणी अमरसूर्या यांना राष्ट्रपती अनुरा कुमार दिसानायके यांनी पद व गोपनियतेची शपथ दिली.
राष्ट्रपती अनुरा कुमार दिसानायके यांनी स्वत:सह चार सदस्यांचे मंत्रिमंडळ नियुक्त केले. हरिणी अमरसूर्या यांच्याकडे न्याय, शिक्षण, कामगार, उद्योग, विज्ञान आणइ तंत्रज्ञान, आरोग्य आणि गुंतवणूक या मंत्रालयाचा कार्यभार सोपविण्यात आला तर नॅशनल पीपल्स पॉवरचे खासदार विजिथा हेराथ आणि लक्ष्मण निपूर्णाची यांनी कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली. संसद विसर्जित झाल्यानंतर ते काळजीवाहू कॅबिनेटमंत्री म्हणून काम पाहतील. तसेच नोव्हेंबरच्या अखेरीस निवडणुका होऊ शकतात, असे अधिका-यांनी सांगितले.