बुडापेस्ट : वृत्तसंस्था
भारताचा बुद्धिबळपटू डी गुकेशने रविवार, दि. २२ सप्टेंबर २०२४ रोजी बुद्धिबळ ऑलिम्पियाड २०२४ मध्ये इतिहास घडवला. अंतिम सामन्यात त्याने शानदार खेळ केला आणि भारतासाठी सुवर्णपदक जिंकले. डी गुकेशने ४५ व्या ऑलिम्पियाडमध्ये चमकदार कामगिरी करत संपूर्ण जगात भारताचे नाव उंचावले. त्याने चेस ऑलिम्पियाडमधील ८ सामने जिंकले तर २ सामने ड्रॉ झाले. संपूर्ण स्पर्धेत गुकेशने चमकदार कामगिरी केली. ९७ वर्षांच्या इतिहासात ऑलिम्पियाडमध्ये भारताने प्रथमच चेसमध्ये सुवर्णपदक पटकावले. त्यामुळे ही ऐतिहासिक कामगिरी ठरली.
बुद्धिबळ ऑलिम्पियाड २०२४ मध्ये खुल्या विभागात भारताने ऐतिहासिक पहिल्या सुवर्णपदकावर शिक्कामोर्तब केले. भारतीय संघात गुकेश डी, आर प्रज्ञानंद, अर्जुन इरिगसी, विदित गुजराथी, पेंटाला हरिकृष्ण आणि श्रीनाथ नारायणन यांचा समावेश आहे. अर्जुन इरिगसी आणि डी गुकेश यांनी आपापल्या सामन्यांमध्ये विजय मिळवल्यानंतर आणि दुस-या स्थानावर असलेल्या चीनला यूएसएविरुद्ध दोन गुणांचा फटका बसल्यानंतर भारताचे ऐतिहासिक सुवर्णपदक निश्चित झाले.
२०२२ च्या बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये भारताने मायदेशात कांस्यपदक जिंकले. तसेच २०१४ मध्येही कांस्यपदकावरच समाधान मानावे लागले होते. बुडापेस्ट येथे सुरू असलेल्या बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये डी गुकेशने अमेरिकेच्या जागतिक क्रमवारीत दुस-या क्रमांकाच्या फॅबियानो कारुआनाचा पराभव करून ऐतिहासिक सुवर्णपदक निश्चित केले होते.