पंतप्रधान मोदी, राष्ट्राध्यक्ष बायडेन यांच्यात करार
वॉशिंग्टन : वृत्तसंस्था
भारत आणि अमेरिकेतील संरक्षण व्यापारात सातत्याने वाढ होत आहे. आता भारत अमेरिकेकडून अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज ३१ एमक्यू-९ बी (१६ स्काय गार्डियन आणि १५ सी गार्डियन) रिमोटली पायलटेड एअरक्राफ्ट ड्रोन/किलर ड्रोन खरेदी करणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी रविवार, दि. २२ सप्टेंबर २०२४ रोजी अमेरिकेत या करारावर स्वाक्षरी केली. या ड्रोनची किंमत सुमारे ३ अब्ज डॉलर्स आहे.
भारतीय संरक्षण मंत्रालयाने गेल्या वर्षी जूनमध्ये अमेरिकेकडून हवेतून जमिनीवर मारा करणा-या क्षेपणास्त्रांनी सुसज्ज एमक्यू-९ बी स्काय गार्डियन आणि सी गार्डियन सशस्त्र ड्रोन आणि लेझर-गाइडेड बॉम्ब खरेदी करण्यास मंजुरी दिली होती. दरम्यान, आजच्या भेटीत मोदी आणि बायडेन यांनी भारत-अमेरिका संरक्षण सहकार्य रोडमॅपचे कौतुक केले. या रोडमॅप अंतर्गत जेट इंजिन, दारुगोळा आणि ग्राउंड मोबिलिटी सिस्टीम यासारखी अवजड उपकरणे आणि शस्त्रे तयार केली जाणार आहेत.
क्वॉड कॉन्फरन्सनंतर दोन्ही नेत्यांनी द्विपक्षीय बैठक घेतली. या बैठकीत दोन्ही नेत्यांनी भारत-अमेरिका भागीदारी अतिशय मजबूत असल्याचे वर्णन केले आणि ड्रोन खरेदी करारावर स्वाक्षरी केली.