नीचांकी नोंद, अर्थव्यवस्थेची गती मंदावली
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीअखेर म्हणजेच एप्रिल ते जून या काळात आर्थिक विकासाची गती मंदावली आहे. आर्थिक विकासाचे प्रतीक असलेला जीडीपी या तिमाहीत गेल्या १५ महिन्यांतील सर्वात कमी ६.७ टक्के नोंदवला गेला. अर्थात मागच्या ५ तिमाहीपेक्षा यावेळच्या तिमाहीचा विकास दर सर्वांत कमी राहिला आहे. आर्थिक वर्ष २०२३-२४ मधील एप्रिल ते जून या पहिल्या तिमाहीत जीडीपी ८.२ टक्के नोंदवला गेला होता.
यंदा पहिल्या तिमाहीत जीडीपी घसरला असला तरी अर्थव्यवस्थेच्या वाढीची गती स्थिर आहे. यावर्षी एप्रिल ते जून या काळात चीनने ४.७ टक्के जीडीपी नोंदवला. त्या तुलनेत भारताचा ६.७ टक्के जीडीपी हा अधिक आहे. जानेवारी ते मार्च २०२३ या काळात भारतीय जीडीपी ६.२ टक्के होता, जो पुन्हा चीनच्या त्या काळातील जीडीपीपेक्षा अधिक होता.
राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने शुक्रवार, दि. ३० ऑगस्ट २०२४ रोजी जाहीर केलेल्या माहितीनुसार मागील आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीतील ३.७ टक्के वाढीच्या तुलनेत यंदा पहिल्या तिमाहीत कृषी क्षेत्राचा वाढ दर २ टक्के नोंदवला गेला. वित्त, स्थावर मालमत्ता आणि व्यावसायिक सेवा क्षेत्राचा वाढ दरदेखील मागील आर्थिक वर्षातील पहिल्या तिमाहीच्या १२.६ टक्क्यांच्या तुलनेत यंदा ७.१ टक्के झाला आहे.