आयएनएस अरिघात पाणबुडी नौदलात

yongistan
By - YNG ONLINE
विशाखापट्टणम : विशाखापट्टणम येथील एका कार्यक्रमात गुरुवार, दि. २९ ऑगस्ट २०२४ रोजी देशाची  अणुशक्तीवर चालणारी दुसरी बॅलिस्टिक क्षेपणास्त्र पाणबुडी (एसएसबीएन) ‘आयएनएस अरिघात’ नौदलाच्या ताफ्यात सामील झाली. त्यामुळे भारतीय नौदलाकडे  दोन कार्यरत बॅलिस्टिक क्षेपणास्त्र पाणबुड्या झाल्या आहेत. नौदलाच्या शस्त्रागारात २०१६ पासून आयएनएस अरिहंत कार्यरत आहे. आता आएनएस अरिघात नौदलात दाखल झाली आहे. त्यामुळे नौदलाचे सामर्थ्य वाढले आहे.
नवीन पाणबुडीला प्राचीन संस्कृत शब्द ‘अरिघात’ असे नाव देण्यात आले आहे; ज्याचा अर्थ ‘शत्रूंचा नाश करणारा’ असा होतो. पाणबुडी आपल्या सागरी हितसंबंधांचे रक्षण करण्याच्या भारताच्या वचनबद्धतेचे प्रतीक आहे. ही अरिहंतनंतरची दुसरी आण्विक पाणबुडी आहे. विशाखापट्टणममधील शिप बिल्ंिडग सेंटर (एसबीसी) येथे २०१७ पासून या पाणबुडीचे बांधकाम सुरू होते. आज ती नौदलात दाखल झाली.
आयएनएस अरिघात ही भारताच्या अरिहंत पाणबुडी योजनेचा एक भाग आहे. या योजनेवर तब्बल ९०० अब्ज रुपये खर्च केले जात आहे. आयएनएस अरिहंत आणि आयएनएस अरिघात व्यतिरिक्त, भारत आणखी दोन एसएसबीएन पाणबुडी नौदलात सामील करण्याची योजना आखत आहे. आयएनएस अरिघात या पाणबुडीचे विस्थापन सहा हजार टन आहे आणि लांबी ११२ मीटर आहे. 
अणुभट्टीमुळे पाणबुडीला वेग
आयएनएस अरिघातच्या आत अणुभट्टी बसविण्यात आली आहे, ज्यामुळे या पाणबुडीला वेग मिळतो. ही पाणबुडी पृष्ठभागावर जास्तीत जास्त १२-१५ नॉट्स (२२-२८ किमी/तास) आणि पाण्याखाली गेल्यावर २४ नॉट्स (४४ किमी/तास) वेग देऊ शकते. अरिघातमध्ये दुहेरी हुल, बॅलास्ट टँक, दोन सहाय्यक इंजिन आणि आणीबाणीच्या परिस्थितीसाठी शक्ती आणि गतिशीलता नियंत्रणात आणण्यासाठी थ्रस्टरदेखील बसवण्यात आले आहे.