मेजर ध्यानचंद सिंग हे भारताचे प्रसिद्ध हॉकीपटू होते. त्यांचा जन्म २९ ऑगस्ट १९०५ रोजी उत्तर प्रदेशातील प्रयाग येथे झाला. त्यांचे वडील समशेर दत्त सिंग हे भारतीय लष्करात सुभेदार होते. त्यांचे दोन भाऊही लष्करातच होते. त्यामुळे ध्यानचंदही लष्करातच सामील झाले. लहानपणी त्यांना कुस्तीची आवड होती. पण इतर खेळांची फारशी आवड नव्हती. त्यांचे भाऊ रूप सिंग हे चांगले हॉकीपटू होते. हळूहळू ध्यानचंद यांनाही हॉकीत रस वाटू लागला. एकदा एका लष्कराच्या हॉकी सामन्यात त्यांनी आपले खेळातील कौशल्य दाखवले. वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी ते लष्करात दाखल झाले. हॉकीतील त्यांचे कौशल्य पाहून सुभेदार मेजर भोले तिवारी यांनी त्यांना या खेळातील काही खुबी शिकवल्या. त्यावेळच्या लष्करातील ब्रिटिश अधिका-यांनीही ध्यानचंद यांना प्रोत्साहन दिले. ध्यानचंद यांचे पहिले प्रशिक्षक होते पंकज गुप्ता. त्यांनीच चांद किंवा चंद हे नाव ध्यान सिंग यांना दिले. १९२८, १९३२ आणि १९३६ च्या ऑलिम्पिकमध्ये भारताला सुवर्णपदके मिळवून देण्यात ध्यानचंद यांचा मोठा वाटा होता. १९५६ मध्ये त्यांना पद्मभूषण हा पुरस्कार देऊन भारत सरकारने त्यांचा गौरव केला. मात्र त्यांचे अखेरचे दिवस गरिबीत गेले. ३ डिसेंबर १९७९ राजी कर्करोगाने त्यांचा मृत्यू झाला. त्यांचा जन्मदिन राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून पाळला जातो.
3/related/default