मास्को : वृत्तसंस्था
एकीकडे रशिया-युक्रेन यांच्यातील युद्ध थांबायचे नाव घेत नाही. दुसरीकडे भारत-रशिया यांच्यातील धोरणात्मक भागीदारी अधिक मजबूत होत आहे. रशियात बांधणी करण्यात आलेली आयएनएस तुशिल ही शक्तिशाली युद्धनौका सोमवार, दि. ९ डिसेंबर २०२४ रोजी भारताला सुपूर्द करण्यात आली. मास्कोत झालेल्या कार्यक्रमाला संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि नौदलप्रमुख अॅडमिरल दिनेश के. त्रिपाठी उपस्थित होते.
रशियन बनावाटीच्या आणि स्वदेशी क्षेपणास्त्रासह आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज युद्धनौका आयएनएस तुशिल कार्यान्वित करण्यात आली. या युद्धनौकेमुळे भारतीय नौदलाची सामरिक ताकद आणखी वाढणार आहे. या युद्धनौकेवर १८ अधिकारी आणि १८० सैनिक असतील. ते ३० दिवस समुद्रात राहू शकतात. त्यात प्रगत इलेक्ट्रॉनिक युद्ध प्रणाली आणि २४ मध्यम श्रेणीची क्षेपणास्त्रे तैनात करण्यात आली आहेत. ही युद्धनौका जास्तीत जास्त ५९ किमी., तास वेगाने धावू शकते.
आयएनएस तुशिलचे
वजन ३९०० टन
आयएनएस तुशिल या युद्धनौकेचे वजन ३९०० टन आहे. ही युद्धनौका १२५ मीटर लांब आहे. ती शत्रूंवर प्राणघातक हल्ल्यासाठी ओळखली जाते. आयएनएस तुशिल हे रशियन आणि भारतीय अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि युद्धनौका बांधणीचे उत्तम मिश्रण आहे.