निलगिरी, सुरत विनाशिका युध्दनौकेचे राष्ट्रार्पण

yongistan
By - YNG ONLINE
मोदींच्या उपस्थितीत वाघशीर पाणबुडीही नौदलात सामिल
मुंबई : प्रतिनिधी
भारतीय नौदलाच्या इतिहासात १५ जानेवारी २०२५ हा दिवस ऐतिहासिक ठरला. निलगिरी, सूरत या विनाशिका आणि वाघशीर ही पाणबुडी अशा तीन आघाडीच्या लढाऊ जहाजांचा ताफा भारतीय नौदलात सामील झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, संरक्षण राज्यमंत्री संजय सेठ यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी राज्यपाल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि नौदल प्रमुखांसह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
‘आयएनएस’ सूरत ही सर्वांत मोठी आणि अत्याधुनिक विनाशिका आहे. ही क्षेपणास्त्रवाहू प्रकल्पातील चौथी आणि शेवटची विनाशिका आहे. यामध्ये ७५ टक्के तंत्रज्ञान स्वदेशी आहे. ‘आयएनएस निलगिरी’ ही अत्याधुनिक तंत्रज्ञान प्रकल्पातील पहिली युद्धनौका आहे. ‘आयएनएस वाघशीर’ ही प्रकल्पातील सहावी पाणबुडी असून फ्रान्सच्या सहकार्यातून ती बनविण्यात आली. 
एकाच दिवशी नौदलाच्या ताफ्यात दोन विनाशिका आणि एक पाणबुडी सामील होण्याची ही पहिलीच वेळ आहे. विशेष बाब म्हणजे मुंबईतील माझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेड येथे या तिन्ही लढाऊ युद्धनौकांचे आरेखन आणि बांधणी करण्यात आली. अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज असलेल्या या युद्धनौका आणि पाणबुड्या यशस्वीरीत्या बनवून कार्यान्वित करण्यात आल्याने युद्धनौका आरेखन आणि बांधणी क्षेत्रात भारताने केलेल्या जलद प्रगतीवर प्रकाश पडला. 
भारत आता एक प्रमुख सागरी शक्ती म्हणून उदयास येत आहे. भारत विस्तारवाद नव्हे तर विकासवाद म्हणून काम करीत आहे.समुद्री मार्ग सुरक्षित राहणे अत्यंत महत्त्वाचे आहे. दहशतवाद, शस्त्रात्रांचा व्यापार आणि अंमली पदार्थांच्या तस्करीपासून सुरक्षित ठेवण्याची गरज आहे. २१ व्या शतकातील भारताच्या सैन्याची क्षमता अधिक सक्षम आणि आधुनिक व्हावी ही देशाची प्राथमिकता आहे. 
कर्नाटकात सर्वात मोठा 
हेलिकॉप्टर निर्मिती कारखाना 
५ हजारांपेक्षा जास्त उपकरणे आता विदेशाऐवजी भारतातच निर्माण केली जात आहेत. गेल्या १० वर्षांत कर्नाटकात देशातील सर्वात मोठा हेलिकॉप्टर निर्मिती कारखाना, लढाऊ विमाने बनवणारा कारखाना सुरू झाला आहे. नौदलानेदेखील मेक इन इंडिया अभियानाचा मोठा विस्तार केला आहे. त्यामध्ये माझगाव डॉकमधील कर्मचा-यांची मोठी भूमिका आहे. भारतीय नौदलात गेल्या १० वर्षांत ३३ जहाजे आणि ७ पाणबुडींचा समावेश झाला आहे. त्यापैकी ३९ भारतातील शिपयार्डमध्ये तयार झाले. त्यामध्ये विमानवाहू युद्धनौका आयएनएस विक्रांत आणि आयएनएस अरिघात यांसारख्या न्युक्लिअर पाणबुडीचा समावेश आहे.

संरक्षण क्षेत्राचा कायापालट 
भारताचे संरक्षण निर्मिती उत्पादन सव्वालाख कोटींपेक्षा जास्त झाले आहे. भारताच्या संरक्षण क्षेत्राचा कायापालट होत आहे. भारत सध्या १०० पेक्षा अधिक देशांना संरक्षण सामग्री निर्यात करीत आहे. मेक इन इंडियाद्वारे भारतीय सैन्याच्या संरक्षण सज्जतेत वाढ होत असून, आर्थिक क्षेत्रातदेखील प्रगतीचे दरवाजे उघडत आहे. शिप बिल्डिंग इको सिस्टीममध्ये जेवढी गुंतवणूक केली जाते, त्याच्या दुप्पट आर्थिक क्षेत्रात लाभ होतो. ६० मोठी जहाजे सध्या देशात बनवली जात आहेत, त्यांची किंमत दीड लाख कोटी एवढी आहे. रोजगार निर्मितीत त्याचा सहापट लाभ होतो, असे पंतप्रधान म्हणाले. २ हजार कर्मचारी जहाज बनवत असतील तर त्यांच्यावर अवलंबून असलेल्या क्षेत्रात किमान १२ हजार रोजगार तयार होतात.