राजकोट : वृत्तसंस्था
दंगल चित्रपटातील आमीर खानचा डायलॉग सिद्ध करुन दाखवत महिला टीम इंडियाने बुधवार, दि. १५ जानेवारी २०२५ डोळे दिपवणारी कामगिरी केली. भारतविरुद्ध आयर्लंड यांच्यातील तिस-या एकदिवसीय सामन्यात टीम इंडियाने तब्बल ३०४ धावांनी विजय मिळवला. या विजयासह टीम इंडियाने ३-० ने मालिका विजयही मिळवला. कर्णधार स्मृती मानधनाच्या नेतृत्वात भारतीय महिला संघाने आज नादखुळा फलंदाजी व गोलंदाजी केली.
तिस-या आणि शेवटच्या वनडे सामन्यात स्मृतीने ७० चेंडूत शतक पूर्ण केले. यासह तिने वनडे क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान शतक ठोकण्याचा कारनामा केला. यापूर्वी हा विक्रम हरमनप्रीत कौरच्या नावावर होता. तिने ८७ चेंडूत शतक ठोकले होते. आता मंधानाने ७० चेंडूत शतक ठोकून नवा विक्रम प्रस्थापित केला. स्मृती यासह टीम इंडियाकडून वेगवान शतक करणारी पहिली महिला क्रिकेटर ठरली.
स्मृतीच्या एकदिवसीय कारकीर्दीतील हे १० वे शतक ठरले. स्मृतीने यासह १० एकदिवसीय शतके ठोकणारी पहिली भारतीय आणि एकूण चौथी महिला क्रिकेटपटू ठरली. स्मृतीने प्रतिका रावल हिच्यासह २३३ धावांची सलामी भागीदारी केली. यात तिने १३५ धावांची खेळी केली. स्मृतीने १६८.७५ च्या स्ट्राईक रेटने ही खेळी केली. स्मृतीने या खेळीत १२ चौकार आणि ७ षटकार लगावले. स्मृतीने चौकार आणि षटकारांच्या मदतीने १९ बॉलमध्ये ९० धावा केल्या.