अमेरिकेत पुन्हा ट्रम्प पर्व, बनले ४७ राष्ट्राध्यक्ष

yongistan
By - YNG ONLINE
जेडी वेन्स यांनी घेतली उपराष्ट्राध्यक्षपदाची शपथ
वॉशिंग्टन : वृत्तसंस्था 
अमेरिकेत पुन्हा एकदा ट्रम्प पर्व सुरू झाले आहे. ट्रम्प यांनी ४७ वे राष्ट्राध्यक्ष म्हणून सोमवार, दि. २० जानेवारी २० शपथ घेतली. ट्रम्प यांना सरन्यायाधीश जॉन रॉबर्टस यांनी पद व गोपनियतेची शपथ दिली तर जेडी वेन्स यांनी उपराष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतली. ट्रम्प दुस-यांदा राष्ट्राध्यक्ष बनले. सूत्रे स्वीकारताच त्यांनी अमेरिका फर्स्ट या धोरणानुसार काम करणार असून अमेरिकेच्या हिताचे निर्णय घेणार असल्याचे जाहीर केले. तसेच देशातील ड्रग्ज तस्करांना दहशतवादी घोषित करणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला.
अमेरिकन संसदेत भारतीय वेळेनुसार सोमवार, दि. २० जानेवारी २०२५ रोजी रात्री १०.३० वाजता शपथविधी सोहळा पार पडला. या सोहळ््यात आलेल्या मेलेनिया ट्रम्प यांनी न्यूयॉर्कहून डिझाईन करण्यात आलेला खास ड्रेस परिधान केला होता. मेलेनिया यांचा हा खास ड्रेस रॉल्फ लॉरेन यांनी डिझाईन केला होता. ट्रम्प यांच्या शपथविधीसाठी फेसबुकचे संस्थापक मार्क झुकरबर्ग, अ‍ॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस आणि ईलॉन मस्क यांच्यासह अनेक दिग्गजांनी उपस्थिती लावली. 
ट्रम्प यांनी त्यांच्या पदाच्या पहिल्याच दिवशी सुमारे १०० कार्यकारी आदेश जारी करण्याचे वचन दिले. आता ते सुमारे २०० कार्यकारी आदेशांवर स्वाक्षरी करण्याच्या तयारीत आहेत. आता स्थलांतरितासंबंधी कठोर निर्णय घेतले जाऊ शकतात. यासोबतच व्हिसाचे नियमही कडक केले जाऊ शकतात. देशातील न्याय विभागाचे होणारे शस्त्रीकरण रोखणार आहे तर निष्पक्षता आणि जबाबदारीचे शासन देण्यासाठी कटिबद्ध असणार आहे. आता अमेरिकेचा सुवर्णकाळ सुरू झाला आहे. देशाचे सार्वभौमत्व पुन्हा मिळवणार आहे, सुरक्षा अबाधित राखली जाणार आहे. तसेच न्यायाचा तराजू संतुलित ठेवण्यावर भर असणार आहे. 
ड्रग्ज तस्कर ठरणार दहशतवादी
जगातील सर्वात बलवान लष्कर म्हणून अमेरिकेच्या लष्कराची बांधणी करणार आहे. तसेच मेक्सिकोच्या सीमेवर नॅशनल इमर्जन्सी जाहीर करणार आहे. तसेच ड्रग कार्टेल संस्थांना दहशतवादी संघटना म्हणून घोषित करण्यासाठी देखील पावले उचलू शकतात, असे संकेत दिले.