राज्य निवडणूक आयुक्त पदी वाघमारे

yongistan
By - YNG ONLINE
मुंबई : प्रतिनिधी 
गेल्या ४ महिन्यांपासून रिक्त असलेल्या राज्य निवडणूक आयुक्तपदी वैद्यकीय शिक्षण विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव दिनेश वाघमारे यांची नियुक्ती करण्यात आली. सामान्य प्रशासन विभागाने सोमवार, दि. २० जानेवारी २०२५ रोजी वाघमारे यांच्या नियुक्ती संदर्भातील अधिसूचना जारी केली.
माजी मुख्य सचिव यू. पी. एस. मदान यांची राज्य निवडणूक आयुक्तपदाची मुदत सप्टेंबर २०२४ मध्ये संपली होती. तेव्हापासून राज्य निवडणूक आयुक्त पद रिक्त होते. या पदासाठी दिनेश वाघमारे यांच्यासह  माजी मुख्य सचिव नितीन करीर, मुंबई पोर्ट ट्रस्टचे माजी अध्यक्ष राजीव जलोटा, वित्त आणि नियोजन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव राजगोपाल देवरा  यांच्यात स्पर्धा होती. गेल्या आठवड्यात झालेल्या राज्य मंत्रिपरिषदेच्या बैठकीत राज्य निवडणूक आयुक्त पदासाठी शिफारस करण्याचे अधिकार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्याचा निर्णय झाला होता. त्यानुसार फडणवीस यांनी दावोस दौ-यावर रवाना होण्यापूर्वी राज्य निवडणूक आयुक्त पदासाठी दिनेश वाघमारे यांच्या नावाची शिफारस राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांना केली होती. राज्यपालांनी या शिफारशीवर मान्यतेची मोहोर उमटवल्यानंतर अधिसूचना जारी केली.
दिनेश वाघमारे हे भारतीय  प्रशासकीय सेवेतील १९९४ च्या तुकडीचे अधिकारी आहेत. नियत वयोमानानुसार ते जून २०२५ मध्ये सेवानिवृत्त होणार होते. सेवानिवृत्तीपूर्वीच त्यांची राज्य निवडणूक आयुक्तपदी वर्णी लागली असून ही  नियुक्ती ५ वर्षासाठी असणार आहे.