न्यायालयीन चौकशी अहवालातील धक्कादायक माहिती, पोलिस गोत्यात
मुंबई : प्रतिनिधी
बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याला पोलिसांनी बनावट चकमकीत ठार मारल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. अक्षय शिंदेने पोलिसांकडील रिव्हॉल्व्हर हिसकावून गोळीबार केला. त्यामुळे पोलिसांना स्वसंरक्षणार्थ त्याला मारावे लागले, असा दावा पोलिसांकडून करण्यात आला होता. परंतु रिव्हॉल्व्हरवर अक्षय शिंदेचे ठसेच नाहीत. त्यामुळे गाडीतील ५ पोलिस कर्मचा-यांनीच अक्षयला बनावट चकमकीत ठार मारले, हा अक्षयच्या आई-वडिलांचा दावा खरा आहे, असे चौकशी अहवालात म्हटले आहे.
मुंबई उच्च न्यायालयात सोमवार, दि. २० जानेवारी २०२५ रोजी चौकशी अहवाल सादर करण्यात आला. न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे यांनी या अहवालाचे वाचन केले. या अहवालात एन्काऊंटरमध्ये सहभागी असलेल्या पोलिस कर्मचा-यांना दोषी ठरवण्यात आले आहे. त्यामुळे आता या प्रकरणात पोलिसांवर कारवाई होणार आहे. सर्वप्रथम पोलिसांवर अक्षय शिंदे याला बनावट चकमकीत ठार मारल्याचा गुन्हा दाखल होईल. त्यानंतर या पोलिस कर्मचा-यांवर खटला चालवला जाईल. परंतु राज्य सरकार काय निर्णय घेते, हे पाहावे लागेल.
अक्षय शिंदे याच्यावर बदलापूरच्या शाळेतील दोन चिमुरड्या मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप होता. २३ सप्टेंबरला त्याला तळोजा कारागृहातून रिमांडसाठी नेले जात होते. पोलिसांची गाडी मुंब्रा बायपासच्या परिसरात होती. त्यावेळी अक्षय शिंदेने एपीआय निलेश मोरे यांची सर्व्हिस रिव्हॉल्व्हर खेचली आणि मोरे यांच्यावर ३ गोळ््या फायर केल्या. यातील एक गोळी निलेश मोरेंच्या पायाला लागली आणि २ गोळ््यांचा नेम चुकला. त्यावेळी इतर पोलिस अधिका-यांनी स्वसंरक्षणासाठी गोळीबार केला. यामध्ये अक्षयच्या डोक्यात गोळी शिरली आणि त्याचा जागेवरच मृत्यू झाला, असा दावा करण्यात आला होता. पण न्यायालयीन चौकशी अहवालात हा दावा खोटा असल्याचे म्हटले आहे.