प्रशिक्षणार्थी डॉक्टरची बलात्कार करून केली होती हत्या
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
कोलकाताच्या आर. जी. कर रुग्णालयात प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर बलात्कार करून तिची हत्या करणा-या संजय रॉयला सोमवार दि. २० जानेवारी २०२५ रोजी न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. कोलकात्यामधील एका विशेष न्यायालयाने संजय रॉयला जन्मठेप सुनावली. न्यायालयाने त्याला ५० हजार रुपयांचा दंडदेखील ठोठावला.
शिक्षा सुनावण्याआधी न्यायालयात संजय रॉय आणि न्यायमूर्तींमध्ये झालेला संवाद लक्षवेधी ठरला. तुझ्यावर झालेले बलात्कार आणि हत्येचे आरोप सिद्ध झालेले आहेत. त्यामुळे तुला सुनावण्यात येणा-या संभाव्य शिक्षेबद्दल तुला काय म्हणायचेय, असा प्रश्न न्यायमूर्तींनी रॉयला केला. त्यावर मला कोणत्याही कारणाशिवाय फसवण्यात आले आहे. मी नेहमी रुद्राक्षाची माळ घालतो. जर अपराध माझ्या हातून घडला असता तर रुद्राक्षाची माळ क्राईम सीनवरच तुटली असती. मला बोलू दिले गेले नाही. अनेक कागदपत्रांवर जबरदस्तीने माझ्या स्वाक्ष-या घेण्यात आल्या, असा दावा केला. संजयचा दावा न्यायमूर्तींनी लगेच खोडून काढला. मी तुम्हाला माझ्याशी बोलण्यासाठी अर्धा दिवस दिला होता. मी ३ तास तुमची बाजू ऐकली. माझ्यासमोर असलेले पुरावे, कागदपत्रे, पुरावे, साक्षीदार यांच्या आधारावर दोषी सिद्ध करण्यात आलेले आहे, असे न्यायालयाने म्हटले.