मुख्यमंत्री फडणवीस यांची पत्रकार परिषदेत माहिती
दावोस : वृत्तसंस्था
दावोसमध्ये गुंतवणुकीचे ५४ आणि धोरणात्मक सहकार्याचे ७ असे एकूण ६१ सामजंस्य करार केल्याची माहिती गुरुवार, दि. २४ जानेवारी २०२५ रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. या करारांतून १५.७० लाख कोटी गुंतवणूक महाराष्ट्रात येणार असून, १६ लाख रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. हरित ऊर्जा, ग्रीन हायड्रोजन, डेटा सेंटर शिक्षण, वित्त, आटोमोबाईल, मीडिया, मेटल, हेवी इंडस्ट्रीज आदी क्षेत्रांत गुंतवणूक वाढणार आहे. महाराष्ट्र डेटा सेंटरचे कॅपिटल होईल, असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. दावोस परिषदेत महाराष्ट्राचा बोलबाला पाहायला मिळाला.
स्वित्झर्लंडमधील दावोस येथून मुख्यमंत्री फडणवीस यांनी आज पत्रकारांशी दृकश्राव्य प्रणालीच्या माध्यमातून संवाद साधला. त्यावेळी उद्योग मंत्री उदय सामंत मुंबई येथून सहभागी झाले. दावोसमध्ये यावेळी भारताकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलल्याचा, त्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वामुळे विश्वास निर्माण झाल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
महाराष्ट्रासाठी गुंतवणुकीचे विक्रमी सामंजस्य करार झाले याचा आनंद आहे. यातून भारताची आणि पर्यायाने महाराष्ट्राची ताकद वाढत आहे. या वर्षी विविध क्षेत्रात गुंतवणूक येत आहे. त्यातही एमएमआर हे मॅग्नेट समजले जाते. एमएमआरमध्ये सहा लाख कोटींची गुंतवणूक येत आहे. याशिवाय विदर्भ पाच लाख कोटी, उत्तर महाराष्ट्र ३० हजार कोटी तर मराठवाड्याचे मॅन्युफॅक्चरिंग हब हे शक्तीस्थळ ठरू लागले आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
एआय आणि माहिती
तंत्रज्ञानाबाबत करार
कृत्रिम बुद्धिमत्तांमध्ये महाराष्ट्राला सर्वात पुढे ठेवण्याच्या दृष्टीने अनेक करार करण्यात आले. यामध्ये गुगलशी करार करण्यात आला. डेटा सेंटरमध्ये गुंतवणुकदारांना आकर्षित करण्यात यश आले आहे. एआयमध्ये महाराष्ट्राने सर्वात पहिले पाऊल टाकले आहे. गुगलशीही एक्सलन्स सेंटर स्थापन करण्याचा करार यापूर्वीच केला आहे. यासोबतच हरित ऊर्जा, हायड्रो ऊर्जा, सौरऊर्जा प्रकल्पांना प्राधान्य दिले आहे.