थेट ८ हजार कि.मी. अंतरावर नजर, पाक, चीनसह आखाती देशांवर नजर
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
ब्रम्होस मिसाईल प्रोजेक्ट, एस-४०० मिसाईल डिफेन्स सिस्टीमनंतर आता भारताने रशियासोबत ४ अब्ज डॉलर्सचा नवीन करार केला आहे. या कराराअंतर्गत रशियाचे अत्याधुनिक व्होरोनेझ रडार भारतात तैनात केले जाणार आहे. या अत्याधुनिक रडार यंत्रणेची रेंज तब्बल ८ हजार कि.मी. आहे. त्यामुळे या रडारच्या माध्यमातून ८ हजार कि.मी.पर्यंत नजर ठेवता येणार असून, पाकिस्तान, चीनसह आखाती देशही टप्प्यात येणार आहेत.
रशियन बनावटीचे ही अत्याधुनिक रडार सिस्टीम ८ हजार किमी. दूरवरील हल्ल्यांना परतवून लावण्यास सक्षम असेल. हे रडार कर्नाटकमधील चित्रदुर्ग जिल्ह्यात तैनात केले जाणार आहे. हे रडार भारतासाठी ढालीप्रमाणे काम करणार आहे. चीनने नुकतेच आपले पाचव्या पिढीतील स्टेल्थ लढाऊ विमान जगासमोर आणले आहे. स्टेल्थ तंत्रज्ञानामुळे सामान्य रडार ही लढाऊ विमाने शोधू शकत नाही. परंतु व्होरोनेझ त्याच्या विशेष आणि प्रगत तंत्रज्ञानाद्वारे ते सहजपणे शोधू शकते. रशियाच्या व्होरोनेज रडारच्या तैनातीमुळे भारताची आत्मनिर्भरताही दिसून येईल. या प्रकल्पाचे ६० टक्क्यांहून अधिक काम फक्त भारतातच केले जाणार आहे. डीआरडीओ यात प्रमुख भूमिका बजावणार आहे. अमेरिका आणि पाश्चात्य देशांच्या दबावानंतरही भारताने रशियासोबत ४ अब्ज डॉलर्सचा करार केला आहे.
व्होरानेजची वैशिष्ट्ये
८ हजार कि. मी.चा हा रडार एस-४०० संरक्षण प्रणालीसाठी ओळखल्या जाणा-या रशियाच्या अल्माझ अँड टेक कंपनीने बनवला आहे. हे रडार स्टेल्थ फायटर जेटस्, बॅलेस्टिक मिसाईल आणि इतर हवाई धोके सहज शोधू शकते. याद्वारे चीन आणि पाकिस्तानच्या हवाई तळांवर कोणती विमाने उडत आहेत आणि कोणती लँडिंग करीत आहेत, याची अचूक आणि वास्तविक माहिती भारताला मिळू शकेल.