केजरीवाल यांच्या सत्तेला सुरुंग, केजरीवालांसह दिग्गज पराभूत
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
देशाची राजधानी दिल्लीत झालेल्या विधानसभा निवडणुकीची निकाल शनिवार, दि. ९ फेब्रुवारी २०२५ रोजी जाहीर झाला. या निवडणुकीत सत्ताधारी आपला धक्का देत भाजपने जोरदार मुसंडी मारून एकहाती विजय मिळविला. विशेष म्हणजे या निवडणुकीत खुद्द अरविंद केजरीवाल, उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्यासह दिग्गजांना धूळ चारत विजय संपादित केला आणि तब्बल २७ वर्षांनी राजधानी दिल्लीत कमळ फुलले. ज्या पक्षात दिल्ली बदलण्याची क्षमता असल्याचे बोलले जात होते. त्याच आपला यावेळी जनतेने नाकारले. राजधानी दिल्लीत मागच्या १५ वर्षांपासून आपची सत्ता होती. यंदाच्या निवडणुकीत भाजपने ७० पैकी ४८ जागा जिंकत सत्ता काबिज केली, तर सत्ताधारी आपला केवळ २२ जागांवरच समाधान मानावे लागले. या निवडणुकीत कॉंग्रेसला तर भोपळाही फोडता आला नाही.
दिल्लीतील विधानसभा निवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला. या निवडणुकीत सुरुवातीपासूनच भाजपने जोरदार मुसंडी मारायला सुरुवात केली. दिल्लीत १२ वर्षांपासून सत्तेत असलेल्या आपला नाकारले आणि भाजपने ७० पैकी ४८ जागा जिंकत दिल्लीची सत्ता एकहाती काबीज केली. आपला केवळ २२ जागांवरच समाधान मानावे लागले. कॉंग्रेसला तर या निवडणुकीत भोपळाही फोडता आला नाही. दिल्लीत आपचे नेते अरविंद केजरीवाल यांच्यासह मनीष सिसोदिया, सत्येंद्र जैन, सौरभ भारद्वाज यांच्यासह इतर बड्या नेत्यांना पराभवाचा सामना करावा लागला. आम आदमी पक्षाने हा पराभव स्वीकारला. दरम्यान, या निकालानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा विकास आणि सुशासनाचा विजय असल्याचे म्हटले.
२०१५ च्या निवडणुकीत भाजपला केवळ ३ जागांवर समाधान मानावे लागले होते. त्यानंतर भाजपाने १० वर्षांत मुसंडी मारून सर्वाधिक जागा जिंकल्या. या निवडणुकीत अरविंद केजरीवाल, मनीष सिसोदिया, सत्येंद्र जैन पराभूत झाले. नोव्हेंबर १९९३ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपाने ७० पैकी ४९ जागा जिंकून दिल्लीचा तख्त राखला होता. मदनलाल खुराणा, ओ. पी. कोहली आणि व्ही. के. मल्होत्रा यांसारख्या नेत्यांनी भाजपाच्या विजयात मोलाची भूमिका बजावली होती. त्यावेळी मदनलाल खुराना मुख्यमंत्री झाले. १९९८ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी दक्षिण दिल्लीच्या तत्कालीन खासदार सुषमा स्वराज यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. पण २००३ मध्ये भाजपाचा पराभव झाला आणि पुन्हा काँग्रेसची सत्ता आली. पुढील १५ वर्षे म्हणजेच २०१३ पर्यंत काँग्रेसने दिल्लीवर राज्य केले.
२०१३ मध्ये झालेल्या निवडणुकीत भाजपाने ३१ जागा मिळवून सर्वाधिक जागा मिळवणारा मोठा पक्ष ठरला. त्यावेळी आपला २८ जागा तर काँग्रेसला ८ जागा मिळाल्याने या दोन्ही पक्षांनी एकत्र येत सत्ता स्थापन केली. पण ४९ दिवसांत हे सरकार कोसळले. २०१५ मध्ये आपने ७० पैकी ६७ जागा मिळवल्या तर २०२० मध्ये ६२ जागा जिंकत केजरीवाल सलग तिस-यांदा सत्तेत आले. पण यावेळी आपला मोठा धक्का बसला.
कॉंग्रेसमुळे १३ मतदारसंघांत फटका
आम आदमी पक्षाला काँग्रेसमुळेही मोठा फटका बसल्याचे निवडणुकीच्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले. दिल्ली निवडणुकीत एकूण १३ मतदारसंघांमध्ये काँग्रेसच्या उमेदवारांनी घेतलेली मतं ही भाजपाच्या उमेदवाराच्या विजयी मताधिक्यापेक्षा जास्त आहेत. खुद्द आपचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांनादेखील याचा फटका बसल्याचे दिसून आले.
दिग्गज पराभूत
दिल्लीत आपचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांचा नवी दिल्ली मतदार संघात पराभव झाला. दुसरीकडे मनीष सिसोदिया यांचा जंगपुरा, सौरभ भारद्वाज यांचा ग्रेटर कैलाश, सोमनाथ भारती यांचा मालवीय नगर तर दुर्गेश पाठक यांचा राजेंद्र नगर मतदारसंघात पराभव झाला. या सर्व जागांवर काँग्रेसला भाजपाच्या विजयी मताधिक्यापेक्षा जास्त मतं मिळाली आहेत.