३५ चेंडूंत झळकावले वादळी शतक
१४ वर्षीय वैभवने रचला इतिहास
जयपूर : आयपीएल २०२५ स्पर्धेतील आज ४७ व्या सामन्यात १४ वर्षीय वैभव सूर्यवंशी गुजरात टायटन्सच्या अनुभवी गोलंदाजांवर चांगलाच तुटून पडला आणि त्याने अवघ्या ३५ चेंडूत वादळी शतक झळकावून इतिहास रचला. आयपीएलच्या इतिहासात वेगवान शतक झळकावणारा सर्वांत युवा आणि पहिला भारतीय ठरला. त्याने युसूफ पठाण याचा विक्रम मोडित काढला. युसूफ पठाणने ३७ चेंडूत शतक झळकावले होते. विशेष म्हणजे पठाणनेही २०१० मध्ये राजस्थान रॉयल्सकडूनच मुंबईविरुद्ध खेळताना हे शतक झळकावले होते. १५ वर्षांनंतर वैभव सूर्यवंशीने त्याला मागे टाकले.
राजस्थान रॉयल्सच्या युवा सलामीवीर वैभव सूर्यवंशीने आज गुजरात टायटन्सविरोधात मोहमद सिराज, इशांत शर्मा आणि राशिद खानसारख्या अनुभवी गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. त्याने यशस्वी जयस्वालसोबत डावाची सुरुवात करताना अतिशय आक्रमक फलंदाजी केली. त्याने मोहम्मद सिराजला षटकार मारत आपले खाते उघडले. त्यावेळीच वैभव या सामन्यात काही तरी वेगळे करणार याची चुणूक दिसली होती. त्यानंतर त्याने ३५ चेंडूंचा सामना करीत वेगवान शतक झळकावले. तो या स्पर्धेत सर्वांत वेगवान शतक झळकावणारा फलंदाज ठरला. त्याने ७ चौकार आणि ११ षटकार खेचले. त्याने आज १७ चेंडूत अर्धशतक पूर्ण केले आणि तो या हंगामातील सर्वांत वेगवान अर्धशतक झळकवणारा पहिला फलंदाज ठरला. यात त्याने निकोलस पुरनला मागे टाकले. अर्धशतकानंतर त्याने अवघ्या १८ चेंडूत शतकापर्यंत मजल मारली. त्यामुळे त्याच्या नावावर नवे विक्रम नोंदले गेले.
वैभवच्या नावे नवे विक्रम
वैभवने आयपीएलमधील सर्वात जलद सेंच्युरी आपल्या नावावर केली. त्याने फक्त ३५ चेंडूंत शतक पूर्ण केले. यावेळी भारताच्या एकाही खेळाडूला ३५ चेंडूंत शतक काही झळकावता आले नाही. त्याचबरोबर आयपीएलमधील शतक झळकावणारा तो सर्वात युवा खेळाडू ठरला. यासोबतच आयपीएल सामन्यात ११ षटकार मारणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरला.
वैभवला मोठे बक्षीस
वैभव सूर्यवंशीच्या शतकी खेळीनंतर बिहारचे मुख्यमंत्री
नितीश कुमार यांनी १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीला १० लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले. आयपीएलमधील गुजरात टायटन्सविरुद्धच्या सामन्यात अवघ्या ३५ चेंडूत शतक झळकावून वैभवने इतिहास रचला. डावखु-या फलंदाजाने सवाई मानसिंग स्टेडियम स्वत:साठी संस्मरणीय बनवले. त्यामुळे त्याला हे बक्षीस जाहीर केले. वैभव बिहारमधील ताजपूरच्या मुक्तेश्वर सिन्हा मॉडेस्टी स्कूलमध्ये नववीच्या वर्गात आहे. तो वयाच्या पाचव्या वर्षापासून क्रिकेट खेळतो. त्याने आयपीएलमध्ये इतिहास घडविला.
आयपीएलमध्ये कमी वयात
पदार्पण करणारे खेळाडू
१) वैभव सूर्यवंशी, राजस्थान (१४ वर्षे, २३ दिवस) -२०२५, प्रयास रे बर्मन, आरसीबी ( १६ वर्षे, १५७ दिवस)-२०१९, मुजीब उर रहमान (१७ वर्षे, ११ दिवस)-पंजाब, रियान पराग, राजस्थान रॉयल्स (१७ वर्षे,१५२ दिवस)-२०१९