भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्लाची अंतराळात झेप
फ्लोरिडा : वृत्तसंस्था
भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला यांच्यासह ४ अंतराळवीरांनी ब-याच दिवसांच्या प्रतिक्षेनंतर बुधवार, दि. २५ जून २०२५ रोजी फ्लोरिडा येथील केनेडी स्पेस स्टेशन येथून अंतराळात आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाकडे एक्सिओम-४ मिशनसाठी झेप घेतली. बुधवारी दुपारी १२.०१ मिनिटांनी मिशन लॉन्च झाले. सुमारे २८ तासांच्या प्रवासानंतर हे ड्रॅगन अंतराळ यान आंतरराष्ट्रीय स्थानकात पोहोचणार आहे.
एक्सिओम-४ हे स्पेसएक्सचे ५३ वे ड्रॅगन मिशन आहे आणि १५ वी मानवी अंतराळ मोहीम आहे. या मोहिमेत शुभांशू शुक्ला यांच्यासह कमांडर पेगी व्हिटसन (यूएसए), मिशन स्पेशालिस्ट स्लाव्होस उजनांस्की (पोलंड) आणि मिशन स्पेशालिस्ट टिबोर कापू (हंगेरी) यांनीही अंतराळात यशस्वी झेप घेतली. ही मोहीम आधी ८ जून रोजी सुरू होणार होती. पण खराब हवामानामुळे ती १० जूनपर्यंत पुढे ढकलण्यात आली. त्यानंतरही पुढे-पुढे ढकलत आज अखेर २५ जूनला मुहूर्त लागला आणि शुंभाशू शुक्ला यांच्यासह ४ अंतराळवीरांनी अंतराळात उड्डाण केले.
शुभांशू शुक्ला ग्रुप कॅप्टन
भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला हे ग्रुप कॅप्टन असून, ते उत्तर प्रदेशातील लखनौचे रहिवासी आहेत. शुभांशू यांनी लखनौमधील सिटी मॉन्टेसरी स्कूलच्या अलीगंज शाखेतून १२ वीपर्यंतचे शिक्षण घेतले. त्यानंतर त्यांनी राष्ट्रीय संरक्षण अकादमी (एनडीए) परीक्षा दिली आणि त्यात ते पास झाले. २००५ मध्ये एनडीएमधून पदवी घेतल्यानंतर जून २००६ मध्ये ते भारतीय हवाई दलात पायलट म्हणून रुजू झाले. आतापर्यंत त्यांनी एसयू-३० एमकेआय, मिग-२१, मिग-२९, जग्वार, हॉक, डोर्नियर २२८ आणि एएन-३२ ही लढाऊ विमाने उडवलेली आहेत. आता ते अंतराळात प्रयोग करताना दिसणार आहेत.
अंतराळ प्रवासादरम्यान
भारतीयांना पाठवला संदेश
शुभांशू शुक्ला यांनी अंतराळाच्या दिशेने प्रवास करताना भारतीयांसाठी एक संदेश पाठविला असून, हा आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाच्या दिशेने जाणारा प्रवास भारताच्या मानवी अंतराळ मोहिमेची सुरुवात आहे. तुम्ही सर्वांनीही या प्रवासात सहप्रवासी बनावे. आपण सर्वांनी मिळून भारताच्या मानवी अंतराळ मोहिमेची सुरुवात करू या, जय हिंद, जय भारत, असे म्हटले. २०१९ मध्ये त्यांना विंग कमांडर आणि मार्च २०२४ मध्ये ग्रुप कॅप्टन पदावर बढती मिळालेली आहे. आता ते अंतराळात प्रयोग करताना दिसणार आहेत.
विविध कारणांमुळे प्रक्षेपणाला उशीर
यापूर्वी आधी खराब हवामानामुळे आणि नंतर स्पेसएक्सच्या फाल्कन-९ रॉकेट आणि नंतर आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाच्या रशियन मॉड्यूलमध्ये गळती आढळल्याने प्रक्षेपण अनेकवेळा लांबणीवर पडले. यापूर्वी २९ मे रोजी लाँच होणार होते. त्यानंतर ती ८ जून, १० जून आणि ११ जूनपर्यंत पुढे ढकलावी लागली आणि अखेर २५ जून रोजी हे यान अंतराळात झेपावले.