भारतीय गुप्तचर संघटनेच्या प्रमुखपदी पराग जैन

yongistan
By - YNG ONLINE
१ जुलै रोजी पदभार स्वीकारणार
नवी दिल्ली : वृत्तसंस्था 
भारत सरकारने १९८९ च्या बॅचच्या पंजाब केडरचे आयपीएस पराग जैन यांची देशाच्या रॉ या गुप्तचर संस्थेचे प्रमुख म्हणून नियुक्ती केली आहे. त्यांचा कार्यकाळ दोन वर्षांचा असेल. ते ३० जून रोजी निवृत्त होत असलेल्या रवी सिन्हा यांची जागा घेतील. १ जुलै रोजी ते पदभार स्वीकारतील.

पराग हे ब-याच काळापासून रॉशी संबंधित आहेत. त्यांनी माजी रॉप्रमुख सामंत गोयल यांच्यासोबत जवळून काम केले आहे. ते पाकिस्तान डेस्क हाताळत आहेत. त्यांनी कलम ३७० हटवणे आणि बालाकोट हवाई हल्ला यासारख्या महत्त्वाच्या मोहिमांवर काम केले आहे.

पराग हे एव्हिएशन रिसर्च सेंटर (एआरसी) चे प्रमुखदेखील आहेत, जिथे त्यांनी ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तानच्या दहशतवादी छावण्या ओळखण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. पराग जैन यांनी एसएसपी चंदीगड आणि डीआयजी लुधियाना ही पदेदेखील भूषवली आहेत. पंजाबमधील त्यांच्या कर्तव्यादरम्यान त्यांनी अनेक दहशतवादविरोधी कारवायांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली. जैन यांनी कॅनडा-श्रीलंकेत भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. कॅनडामधील त्यांच्या पोस्टिंगदरम्यान त्यांनी खलिस्तान समर्थक नेटवर्कचा पर्दाफाश केला.

रवी सिन्हा यांची 
३० जून रोजी निवृत्ती
३० जून २०२३ रोजी छत्तीसगड कॅडरचे वरिष्ठ आयपीएस अधिकारी रवी सिन्हा यांची भारताच्या गुप्तचर संस्थेचे (रिसर्च अँड अ‍ॅनालिसिस विंग) नवे प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्यांनी तत्कालीन रॉ प्रमुख सामंत कुमार गोयल यांची जागा घेतली होती. रवी सिन्हा हे बिहारच्या भोजपूर जिल्ह्यातील आहेत. आयपीएस रवी सिन्हा यांना ऑपरेशन मॅन म्हणूनही ओळखले जाते. ते गुप्तपणे काम करण्यासाठी ओळखले जातात.