इराण-इस्रायल युद्धात अमेरिकेची उडी, बॉम्बरचा केला वापर
३ अणुप्रकल्प उद्ध्वस्त केल्याचा ट्रम्प यांचा दावा, इराणने केला इन्कार
वॉशिंग्टन : वृत्तसंस्था
इराण आणि इस्रायलमधील संघर्षात आता अमेरिकेने उडी घेतली आहे. रविवारी पहाटे अमेरिकेच्या लढाऊ विमानांनी इराणमधील ३ महत्त्वाच्या आण्विक तळांवर जोरदार हल्ला केला. यासाठी सर्वांत धोकादायक बी-२ बॉम्बर विमान वापरले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विट करून इराणमधील फोर्डो, नतान्झ आणि इस्फहान या ३ अणुप्रकल्पांना लक्ष्य करीत हल्ला केला असून, ही तिन्ही केंद्रे नष्ट केल्याचा दावा केला. दरम्यान, अमेरिकेने ज्या तीन अणुस्थळांवर हल्ला केला, तिथे कोणतीही अणू गळती झालेली नाही. येथून युरेनियम आधीच हटवण्यात आले होते, असा दावा इराणने केला आहे. या स्थितीत मध्य-पूर्वेत मोठ्या युद्धाची शक्यता निर्माण झाली आहे.
सर्वांत घातक बॉम्बरच्या हल्ल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विट करून अमेरिकेने इराणमधील फोर्डो, नतान्झ आणि इस्फहान या तीन अणुसंवर्धन केंद्रांवर हल्ला केला आणि ही केंद्रे पूर्णपणे नष्ट करण्यात आली असल्याचे म्हटले. बी-२ बॉम्बर विमान जगातील एकमेव लढाऊ विमान आहे, जे फोर्डोसारख्या इराणच्या भूमिगत अणुप्रकल्पांना लक्ष्य करू शकत होते. अमेरिकेने या केंद्रावर जीबीयू-५७ हे ७ बंकर बस्टर बॉम्ब टाकले. हे बॉम्ब जवळपास १३ हजार ५०० किलो वजनाचे आहेत. या जोरदार बॉम्ब हल्ल्यानंतर अमेरिकन लढाऊ विमाने इराणी हवाई हद्दीतून सुरक्षितरित्या बाहेर पडली. अमेरिकन बी-२ बॉम्बर विमानांनी काल अमेरिकेतील व्हाईट मॅन एअरफोर्स बेसवरून उड्डाण घेतले होते. १२ हजार किलोमीटरचे अंतर कापून अमेरिकन विमानांनी इराणच्या अणुप्रकल्पांवर हल्ला केला.
इराणवरच्या हल्ल्यासाठी अमेरिकेने टॉमहॉक मिसाईल्सचाही वापर केल्याची ही माहिती आहे. या मिसाईल्स अमेरिकेने इराणच्या ड्रोन आणि लष्करी तळांना नष्ट करण्यासाठी वापरली आहेत. या हल्ल्यानंतर इराणने ही युद्धाची अनावश्यक कारवाई मानत असल्याचे सांगत आता आम्ही गप्प बसणार नाही आणि बदला घेतल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा अमेरिकेला दिला आहे.
...तर महायुद्धाचा भडका
अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराणने रशियाकडे मदतीसाठी याचना केली आहे. इराणचे परराष्ट्रमंत्री अब्बास अरागची हे रशियाच्या दौ-यावर गेले आहेत. या दौ-यात ते रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्याशी गंभीर विषयांवर चर्चा करणार आहेत. त्यामुळे रशिया आता काय भूमिका घेणार हे पाहावे लागेल. यात रशियाने इराणला साथ दिल्यास महायुद्धाचा भडका उडू शकतो.
बॉम्बचे वजन साडेतेरा हजार किलोग्रॅम
३० हजार पौंड
बी-२ हे अमेरिकेचे बॉम्बर जेट आहे. जे एकावेळी दोन जीबीयू-५७ मॅसिव्ह ऑर्डनन्स पेनेट्रेटर बॉम्ब वाहून नेऊ शकते. या प्रत्येक बॉम्बचे वजन ३० हजार पौंड म्हणजेच साडेतेरा हजार किलोग्रॅम वजन आहे. जे जमिनीत खोलवर गाडलेले लक्ष्यही भेदू शकते. त्याला बंकर बस्टर बॉम्ब म्हणतात. इराणमधील फोर्डो अणु सुविधा केंद्र त्याच पद्धतीने उभे केलेले आहे. हे केंद्र डोंगराखाली ८० मीटर खोलवर आहे. त्यासाठी अमेरिकेने बंकर बस्टरचा वापर केला. बी-२ बॉम्बर एका वेळी दोन जीबीयू-५७ बंकर बस्टर बॉम्ब वाहून नेऊ शकतो. ते जवळपास ६० फूट मजबूत काँक्रीट किंवा २०० फूट माती भेदून लक्ष्याला नष्ट करू शकते.