भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्लांशी पंतप्रधान मोदींचा संवाद
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकात जाणारे पहिले भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला यांच्याशी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जवळपास १८ मिनिटे संवाद साधला. यावेळी मोदी यांनी आज तुम्ही भलेही मातृभूमीपासून दूर आहात. परंतु तुम्ही प्रत्येक भारतीयांच्या मनात आहात. तुमच्या नावात शुभ आहे. त्यामुळे तुमचा हा अंतराळ प्रवास नव्या युगाचा शुभारंभ आहे, अशा शब्दांत गौरवोद्गार काढले. यावेळी त्यांनी जगासाठी भारत अवकाशातील नवीन उपक्रमांकरिता दरवाजे उघडणार असल्याचे सांगितले.
सध्या आपण दोघेच बोलत आहोत. पण माझ्याबरोबर १४० कोटी भारतीयांच्या भावना आहेत. माझ्या आवाजात सर्व भारतीयांचा उत्साह सामील आहे. अंतराळात भारताचा झेंडा फडकवल्याबद्दल मी तुमचे मनापासून अभिनंदन करतो, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. आज मी आत्मविश्वासाने सांगू शकतो की, भारताच्या गगनयान मोहिमेच्या यशाचा हा पहिला अध्याय आहे. तुमचा हा ऐतिहासिक प्रवास केवळ आकाशापुरता मर्यादित नाही तर तो विकसित भारताच्या आपल्या प्रवासाला गती आणि नवीन बळ देईल. भारत आता जगासाठी अवकाशातील नवीन उपक्रमांसाठी दरवाजे उघडणार आहे, असे पंतप्रधानांनी सांगितले.
राकेश शर्मा यांच्यानंतर ४१ वर्षांनी शुभांशू शुक्ला यांनी बुधवारी (दि. २५ जून) स्पेसएक्स ड्रॅगन अंतराळयानातून फ्लोरिडा येथील नासाच्या केनेडी अवकाश केंद्रातून आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकाकडे झेप घेतली. २८ तासांचा प्रवास करून ते गुरुवारी अवकाश स्थानकाजवळ पोहोचले आणि त्यांनी यशस्वी डॉकिंगही केले. मिशन पायलट म्हणून शुभांशू शुक्ला या मोहिमेत काम करणार आहेत. त्यांच्याबरोबर अमेरिकेचे मिशन कमांडर पेगी व्हिटमन, पोलंडचे मिशन तज्ज्ञ सावोस उझनान्स्की आणि हंगेरीचे टिबोर कापू हेदेखील आहेत.
माझ्यासाठी स्वप्नवत प्रवास
शुभांशू शुक्ला यांनी पंतप्रधान मोदी यांच्या एका प्रश्नाला उत्तर देताना अवकाश स्थानकात सर्व काही व्यवस्थित आहे. माझ्यासाठी हा स्वप्नवत प्रवास होता. पृथ्वीपासून इथपर्यंतचा प्रवास माझ्या एकट्याचा नाही तर संपूर्ण देशाचा प्रवास आहे. अवकाशात भारताचे प्रतिनिधित्व करायला मिळाले, याचा प्रचंड आनंद आहे, असे म्हटले.
१६ सूर्योदय आणि १६ सूर्यास्त
आम्ही सध्या कुठे आहोत हे सांगता येत नाही. आम्ही दिवसातून १६ वेळा परिक्रमा करतो. आम्हाला १६ सूर्योदय आणि सूर्यास्त दिसतात. ही खूपच आश्चर्यकारक प्रक्रिया आहे. या परिक्रमेत आम्ही जवळपास २८ हजार किलोमीटर प्रतीतास वेगाने प्रवास करत आहोत. तुमच्याशी बोलताना आम्हाला या वेगाची जाणीव होत नाही. कारण आम्ही आतमध्ये आहोत. पण कुठे तरी हा वेग आपल्याला दाखवतो की आपला देश किती वेगाने पुढे जात आहे, असे शुक्ला यांनी सांगितले.
बोलण्यासाठी बांधले पाय
मोदींशी बोलताना शुभांशू यांनी तुमच्याशी बोलताना मी माझे पाय बांधले आहेत. कारण येथे गुरुत्वाकर्षण शून्य आहे. जर पाय बांधले नाहीत तर मी तरंगायला सुरुवात करेन. मी जो माईक पकडला आहे, तो सोडला तर तो तरंगत राहील. येथे झोपणे, चालणे, खाणे, पिणे आव्हान आहे. कारण शरीराला गुरुत्वाकर्षणाची सवय आहे. त्यामुळे हे सर्व कठीण जात आहे, असा अनुभव सांगितला.
अंतराळात ७ प्रयोगावर काम
शुक्ला यांनी मला सांगताना खूप अभिमान वाटतो की, पहिल्यांदाच भारतीय शास्त्रज्ञांनी ७ अनोखे प्रयोग तयार केले आहेत. जे मी येथे आंतरराष्ट्रीय स्थानकावर आणले आहेत. मी जो पहिला प्रयोग करणार आहे, तो स्टेम सेल्सवर आधारित आहे. अंतराळात आल्यावर ग्रॅविटी कमी होते. त्यामुळे मसल लॉस म्हणजे स्रायू कमजोर होतात. त्यावर मी प्रयोग करत आहे. काही सप्लीमेंट देऊन आपण मसल लॉस थांबवू शकतो का? किंवा त्याला उशीर लावू शकतो का? याचा थेट फायदा पृथ्वीवरही होईल, असे शुक्ला म्हणाले.
मुलांनो, स्काय इज नेव्हर द लिमिट
मी देशातील मुलांना सांगेन की तुम्ही आपले भविष्य चांगले बनवा. कारण त्यामुळे फक्त मुलांचेच नाही तर देशाचे भविष्यही उज्ज्वल होईल. नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा की स्काय इज नेव्हर द लिमिट. माझ्या मागे जो तुम्ही तिरंगा पाहत आहात, तो आधी नव्हता. तो मी इथे कालच लावला आहे. तो मला खूप भावुक करतो, असे शुक्ला यांनी सांगितले.