वाढती बाल गुन्हेगारी चिंतेचा विषय

yongistan
By - YNG ONLINE
             क्रिकेट खेळण्याच्या किरकोळ वादातून आठवीतील विद्यार्थ्याने नववीतील विद्यार्थ्याचा चाकूने भोसकून खून केल्याची धक्कादायक घटना अहिल्यानगर शहरातील नामांकित शाळेत घडली. या घटनेने राज्यभर खळबळ उडाली आहे. अर्थात अल्पवयीन मुलाने केलेला हा पहिलाच गंभीर गुन्हा नाही. याआधीही असे अनेक गुन्हे अल्पवयीन मुलांकडून घडले आहेत. गेल्याच वर्षी शाळेची बॅग फाडली या कारणामुळे  एका शाळकरी विद्यार्थ्याने दुसऱ्या शाळकरी विद्यार्थ्यावर चाकूने वार केल्याची घटना पुण्यात  घडली होती.  दोन वर्षापूर्वी क्राईम मालिका पाहून एका अल्पवयीन मुलाने आपल्या आजीची हत्या केल्याची घटना पुण्यातच घडली होती. तीनवर्षापूर्वी एका आठ वर्षीय मुलाने आपल्याच पाच वर्षीय बहिणीवर ब्लेडने वार करून हत्या केल्याची घटना जालना शहरात घडली होती.  अल्पवयीन मुलांकडून असे गंभीर  स्वरूपाचे गुन्हे घडल्याच्या बातम्या अलीकडे सातत्याने वर्तमानपत्रात वाचायला मिळतात याचाच अर्थ देशात बाल गुन्हेगारी वाढत चालली आहे. सण २०२२ - २३ या एका वर्षात एकट्या पुणे शहरात अशा प्रकारचे २४८ गुन्हे घडले असून पुण्याच्या ग्रामीण भागात १०४ गुन्हे घडले आहेत. राष्ट्रीय गुन्हे नोंदणी अहवालातच ही आकडेवारी नमूद करण्यात आली आहे.  जर एकट्या पुण्यात एकावर्षात अल्पवयीन मुलांकडून इतके गुन्हे होत असतील तर संपूर्ण राज्यात आणि देशात अल्पवयीन मुलांकडून किती गुन्हे घडत असतील याची फक्त कल्पना केली तरी अंगावर काटा येतो. अर्थात देण्यात आलेली ही आकडेवारी फक्त नोंद झालेल्या गुन्ह्यांचीच आहे. पोलिस दप्तरी नोंदवण्यात आलेल्या गुन्ह्यांपैकी काही गुन्हे खून, बलात्कार, विनयभंग, अपहरण यासारखे गंभीर स्वरूपाचे देखील आहेत. गेल्या काही वर्षात बाल गुन्हेगारीचे प्रमाण खूप वाढले आहे. आजकालची मुले गुन्हेगार बनत आहेत ही अत्यंत धोक्याची व खेदाची बाब आहे. झोपडपट्टीत राहणारे अल्प उत्पन्न गटातील मुले गुन्हेगारीकडे लवकर ओढले जातात असे म्हंटले जाते. त्यांचे आई वडील मोल मजुरीसाठी घराबाहेर राहतात त्यामुळे ते मुलांना योग्य संस्कार देऊ शकत नाहीत परिणामी ही मुले गुन्हेगारीकडे वळतात असा तर्क काढला जातो. पण अहिल्यानगर मधील या  व आधीच्या घटनेने  हा तर्क चुकीचा ठरवला आहे. वर उल्लेख केलेल्या सर्व  घटनेतील मुलांचे पालक उच्चशिक्षित असून हे  मुले त्या त्या शहरातील प्रतिष्ठित शाळेतील विद्यार्थी आहेत. याचाच अर्थ सुशिक्षित पालकांचे मुलेही आता गुन्हेगारीकडे वळू लागले आहेत. भारतासारख्या देशात  वाढती बाल गुन्हेगारी ही मोठी समस्या बनली आहे. आजकालच्या मुलांमध्ये भाई, दादा, डॉन बनण्याची मोठी क्रेझ आहे. त्यामुळे ते गुन्हेगारीकडे वळत आहेत. अल्पवयीन मुलांच्या टोळ्या, गँग वाढत आहेत.  पालकांचे लक्ष नसल्याने चोऱ्या, मारामारी, खून यासारख्या गुन्ह्यात  अल्पवयीन मुले अडकत आहेत. या मुलांना वेळीच सल्ला किंवा मार्गदर्शन मिळत नाही ही वस्तुस्थिती आहे. देशातील बाल गुन्हेगारी वाढत आहे ही धोक्याची घंटा आहे. ती कमी करण्यासाठी मुलांना संस्कारक्षम वयात पालक, शिक्षक, समाज यांच्याकडून योग्य  संस्कार व मार्गदर्शन मिळणे गरजेचे आहे. लहान वयात मुले काय करतात, त्यांच्या आवडीनिवडी काय आहेत याचाही विचार आई वडीलांनी करायला हवा. अभ्यासाकडे मुले दुर्लक्ष का करतात याचाही विचार पालक आणि शिक्षकांनी करायला हवा. शिक्षणाऐवजी मुले गुन्हेगारीकडे  वळत आहे ही चिंतनीय बाब आहे याला जितकी सामाजिक परिस्थिती जबाबदार आहे तितकीच कौटुंबिक परिस्थिती देखील  जबाबदार आहे. आपल्या देशात जोवर एकत्र कुटुंब पद्धती होती तोवर बाल गुन्हेगारीचे प्रमाण नगण्य होते पण एकत्र कुटुंब पद्धतीचा  रहास झाला आणि बाल गुन्हेगारी फोफावत गेली असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. मुलांना चांगले शिक्षण देण्यासाठी पालक वाट्टेल ते करतात. त्यांना मोठ मोठ्या इंटरनॅशनल स्कूलमध्ये  लाखो रुपये डोनेशन देऊन दाखल करतात. त्यांना हव्या त्या सर्व वस्तू पुरवतात पण मुलांसोबत वेळ घालवण्यास पालकांना फुरसत नसते. त्रिकोणी, चौकोनी कुटुंब पद्धतीत आजी आजोबा ही संकल्पना केंव्हाच मागे पडली आहे. आई वडील दोघेही नोकरीस असेल तर मुले दिवसभर घरी एकटीच असतात अशावेळी टीव्ही आणि मोबाईल हेच त्यांचे साथीदार असतात. मग दिवसभर टीव्ही वरील क्राईम मालिका पाहणे आणि मोबाईलवर हिंसक गेम खेळणे हाच त्यांचा उद्योग. दिवसभर क्राईम मालिका पाहून आणि मोबाईलवर हिंसक गेम खेळून मुलांच्या मनातही हिंसक विचार येतात. त्यातूनच मग अशा घटना घडतात. त्यामुळेच आज मूल्यशिक्षणाची मोठी गरज निर्माण झाली आहे.