मुंबई : प्रतिनिधी
भाजप आमदार, माजी मंत्री बबनराव लोणीकरांनी शेतक-यांबद्दल केलेले विधान अत्यंत आक्षेपार्ह आहे. नरेंद्र मोदी तुमचा बाप असेल आमचा किंवा शेतक-यांचा बाप असू शकत नाही, असा आक्रमक पवित्रा घेत काँग्रेसचे ज्येष्ठ सदस्य नाना पटोले यांनी या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माफी मागावी अशी जोरदार मागणी दि. १ जुलै २०२५ रोजी विधानसभेत केली. माफीची मागणी करत पटोले अध्यक्षांच्या आसनापर्यंत गेल्याने व विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतल्याने विधानसभेत गदारोळ झाला.
अध्यक्षांनी काही वेळासाठी कामकाज तहकूब केल्यानंतरही पटोले यांनी आक्रमक पवित्रा कायम ठेवल्यामुळे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी नाना पटोले यांना दिवसभराकरिता निलंबित केले. यामुळे संतप्त झालेल्या महाविकास आघाडीच्या सदस्यांनी सभागृहाच्या कामकाजावर दिवसभराकरिता बहिष्कार घातला. काँग्रेसचे ज्येष्ठ सदस्य नाना पटोले यांनी माणिकराव कोकाटे आणि बबनराव लोणीकर यांनी शेतक-यांच्या विरोधात केलेल्या अवमानास्पद वक्तव्यांचा मुद्दा विधानसभेत उपस्थित केला. लोणीकर यांनी शेतक-यांचा बाप काढला. सत्ताधारी मंत्री, आमदार सातत्याने शेतक-यांचा अपमान करत आहेत. हा अपमान आता राज्यातील शेतकरी सहन करणार नाही. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी शेतक-यांची जाहीर माफी मागितली पाहिजे. मोदी तुमचा बाप असेल शेतक-यांचा बाप होऊ शकत नाही. शेतक-यांचा अवमान करणा-यांवर कारवाई झाली पाहिजे असा संताप पटोले यांनी व्यक्त केला. मुख्यमंत्री फडणवीस यांनी माफी मागितली पाहिजे, अशी मागणी पटोले यांनी केली. नाना पटोले यांच्यासह विरोधी पक्षाच्या सर्वच सदस्यांनी आक्रमक पवित्रा घेतला. नाना पटोले आणि विजय वडेटटीवार यांनी अध्यक्षांच्या आसनाच्या बाजूला धाव घेतली. पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा उल्लेख केल्याने सत्ताधारी सदस्यही आक्रमक झाले.
अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी पटोले यांच्या वक्तव्यावर नापसंती व्यक्त करताना अध्यक्ष राहिलेल्या व्यक्तीकडून असंसदीय भाषेचा उपयोग होणे, मला बरोबर वाटत नाही हे चुकीचे असल्याची समज दिली. पटोले यांनी विधानसभा अध्यक्षांच्या आसनाजवळ जात आपला संताप व्यक्त केला. यामुळे राहुल नार्वेकर यांनी सभागृहाची बैठक पाच मिनिटांसाठी तहकूब केली. त्यानंतर कामकाज सुरू झाले, तेव्हाही पटोले आक्रमक होते. नाना पटोले हे सभागृहाचे अध्यक्ष राहले आहेत. राज दंडाला हात लावल्यानंतर काय कारवाई केली जाते, याची कल्पना तुम्हाला असेल. मला कारवाई करायला भाग पाडू नका, असा इशारा देऊन त्यांनी पटोले यांना आपल्या जागेवर जाण्यास सांगितले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकाराबद्दल नाराजी व्यक्त करताना अध्यक्षांच्या अंगावर धावून जाणे योग्य नाही, नाना पटोले यांनी माफी मागितली पाहिजे, अशी मागणी केली. यानंतर नाना पटोले यांना दिवसभरासाठी निलंबित करण्यात येत असल्याची घोषणा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केली. त्यांना सभागृहाच्या बाहेर जाण्यास सांगितले. यानंतर नाना पटोले सभागृहाच्या बाहेर निघून गेले तर कारवाईचा निषेध करत विरोधी पक्षाच्या सर्व सदस्यांनी सभात्याग करून दिवसभराच्या कामकाजावर बहिष्कार घातला.