नवी दिल्ली : वृत्तसंस्था
छत्रपती शिवाजी महाराजांच्या तब्बल १२ किल्ल्यांना जागतिक वारसा स्थळाचा दर्जा प्राप्त झाला आहे. महाराष्ट्रातील ११ आणि तामिळनाडूतील १ जिंजी या १२ किल्ल्यांना युनेस्कोचा जागतिक हेरिटेज दर्जा मिळाला. यावर आज पॅरिसमध्ये मतदान पार पडले. त्यात निर्णायक बहुमत मिळवत शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक वारसा स्थळांच्या यादीत स्थान मिळाले.
दीड वर्षापूर्वी या किल्ल्यांचे वर्ल्ड हेरिटेज साइटसाठी नॉमिनेशन झाले होते. फ्रान्सची राजधानी पॅरिस येथे वारसास्थळांत किल्ल्यांचा समावेश व्हावा, यासाठी आज मतदान पार पडले. त्यावेळी अनेक देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले आणि महाराजांच्या किल्ल्यांना बहुमान प्राप्त झाला. छत्रपती शिवाजी महाराजांनी रचलेल्या दुर्गराज्याचा ऐतिहासिक ठसा आंतरराष्ट्रीय स्तरावर अधोरेखित झाला. महाराष्ट्रातील ११ आणि तामिळनाडूतील १ अशा एकूण १२ किल्ल्यांना युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांमध्ये मानांकन मिळाले. हा संपूर्ण महाराष्ट्रासाठी अत्यंत अभिमानाचा क्षण आहे.
या मानांकनासाठी सांस्कृतिक कार्य विभागाच्या अंतर्गत असलेल्या पुरातत्व व वस्तुसंग्रहालये संचालनालय यांच्यातर्फे प्रस्ताव तयार करण्यात आला होता. यात स्वराज्याची राजधानी रायगड, पहिली राजधानी राजगड, प्रतापगड, शिवनेरी, स्वराज्याच्या नौदलाचे प्रमुख केंद्र सिंधुदुर्ग, लोहगड, साल्हेर, सुवर्णदुर्ग, पन्हाळा, विजयदुर्ग, खांदेरी (महाराष्ट्र) आणि जिंजी (तामिळनाडू) या किल्ल्यांचा समावेश आहे. जागतिक वारसा यादीत समावेश करण्यात आलेले सर्व किल्ले सतराव्या शतकात बांधले गेले आहेत. हे किल्ले मराठा सैन्याच्या असामान्य लष्करी व्यवस्थेचा आणि अभेद्य तटबंदीचा भक्कम पुरावा आहे.
शिवाजी महाराजांच्या १२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश झाल्याची गोष्ट ही महाराष्ट्रासाठी ऐतिहासिक आणि अभिमानास्पद असल्याचे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यातील किल्ले हे स्वराज्याच्या इतिहासाचे साक्ष आहेत. शिवराय, शंभुराजेंच्या मावळ््यांनी जीवाची बाजी लावत या किल्ल्यांचे रक्षण केले. अनेक किल्ले शत्रूंच्या ताब्यातून जिंकले. हे किल्ले राजांच्या मावळ््यांच्या शौर्यांची गाथा सांगणारे आहेत. आज या किल्ल्यांना जगातील वारसा स्थळात स्थान मिळाल्याने या किल्ल्यांना जागतिक स्तरावर बहुमान मिळाला आहे.
या किल्ल्यांचा समावेश
-रायगड, राजगड, प्रतापगड, पन्हाळा, शिवनेरी, लोहगड, साल्हेर, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग, खांदेरी, जिंजी
यादीत भारतातील ४२
वारसा स्थळांचा समावेश
युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत भारतातील ४२ वारसा स्थळांचा समावेश आहे. त्यापैकी अजिंठा लेणी, वेरुळची लेणी, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई व्हिक्टोरियन अँड आर्ट डेको एन्सेबल आणि एलिफंटा केव्हज या ५ स्थळांचा समावेश होता. त्यामध्ये आता मराठा लष्करी भूप्रदेश म्हणून शिवरायांच्या १२ किल्ल्यांचा समावेश करण्यात आला.