१९३ पैकी १८२ देशांचा पाठिंबा; भारताची डोकेदुखी वाढली
संयुक्त राष्ट्रे : प्रतिनिधी
अमेरिकन अध्यक्ष ट्रम्प आणि चीनच्या जीवावर माजलेल्या पाकिस्तानची संयुक्त राष्ट्राचे सर्वांत महत्त्वाचे अंग असलेल्या सुरक्षा परिषदेच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. १९३ पैकी १८२ देशांचा पाठिंबा मिळवून पाकिस्तान या पदावर विराजमान झाला. दहशतवादाला पोसणारा पाकिस्तानच संयुक्त राष्ट्रामध्ये आता महत्त्वाच्या स्थानावर गेल्यामुळे भारताची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे.
पाकिस्तानने संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या अध्यक्षपदाची सूत्रे मंगळवारी (१ जुलै) हाती घेतली. याआधी जानेवारी २०२४ मध्ये पाकिस्तानची दोन वर्षांसाठी यूएनएससीचा अस्थायी सदस्य म्हणून निवड झाली होती. आता १९३ सदस्यांपैकी १८२ सदस्यांचा पाठिंबा मिळवत पाकिस्तान सुरक्षा परिषदेच्या अध्यक्षपदी विराजमान झाला. पाकिस्तानची ही निवड जुलै महिन्यासाठी असणार आहे.
पाकिस्तानचे राजदूत मुनीर अकरम यांच्या नेतृत्वात आता यूएनएससीमध्ये जुलै महिन्यातील महत्त्वाच्या चर्चांची दिशा ठरवली जाणार आहे. पाकिस्तानने ही नवी जबाबदारी भू-राजकीय पारदर्शकता, समावेशकता या तत्त्वांवर आधारलेली असल्याची प्रतिक्रिया दिली.
दहशतवादाच्या मुद्यावर
भारताने घेतला आक्षेप
एकीकडे हे पद मिळवण्यासाठी पाकिस्ताने मोठा आंतरराष्ट्रीय पाठिंबा मिळवला तर दुसरीकडे भारताने पाकिस्तानच्या दुटप्पी भूमिकेवर जोरदार टीका केली. दहशतवादाला पोसणारा देश, असे म्हणत भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी पाकिस्तानवर टीका केली. जेव्हा एखादा देश आपल्या शेजारी देशाविरुद्ध दहशतवादाला पाठीशी घालतो, तेव्हा तो केवळ एकाच देशासाठी नव्हे, तर संपूर्ण जागतिक सुरक्षेसाठी धोका असतो अशा शब्दात एस. जयशंकर यांनी तीव्र निषेध व्यक्त केला.