आयात शुल्क हटविल्याने मोठे नुकसान
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
अमेरिकेने भारताच्या कापडावर ५० टक्के शुल्क लागू केल्याने निर्यातीच्या दृष्टीने महत्त्वाच्या या बाजारपेठेवर विपरीत परिणाम होणार आहे तर केंद्र सरकारने कापूस आयातीवरील ११ टक्के शुल्क काढून टाकल्याने विक्रमी आयात होऊन देशामध्ये कापसाचा साठा वाढणार आहे.
३० सप्टेंबरपर्यंत कापसावरील ११ टक्के आयात शुल्क माफ केले. वस्त्रोद्योगाला स्वस्त कच्चा माल उपलब्ध करून देणे आणि निर्यात क्षेत्राला चालना देणे हा या निर्णयाचा उद्देश असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, हा निर्णय घेताना शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचे बोलले जात आहे. शेतकरी आणि कापूस निर्यातदारांनाही आर्थिक फटका बसण्याची चिन्हे आहेत.
कापसावरील आयात शुल्क शून्य टक्के करण्याच्या निर्णयाला केंद्र सरकारने मुदतवाढ दिली आहे. भारतामध्ये कापसाच्या लागवडीखालील क्षेत्र सुमारे १२० लाख हेक्टर इतके आहे. भारतामध्ये जगातील एकूण कापूस क्षेत्राच्या ३६ टक्के इतका कापूस पिकतो. क्षेत्रफळाच्या बाबतीत भारत हा जगातील सर्वात मोठा कापूस उत्पादक देश आहे. भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त कापूस पिकतो. आयात शुल्क शून्य केल्यावर देशांतर्गत कापसाचे भाव ११०० रुपयांनी कोसळले. सरकारचा हा निर्णय आत्मघातकी असल्याची टीका करण्यात येत आहे.