हरहुन्नरी अभिनेता बाळ कर्वे यांचे निधन

yongistan
By - YNG ONLINE



मुंबई : प्रतिनिधी 

ज्येष्ठ अभिनेते बाळ कर्वे यांचे गुरुवार, दि. २८ ऑगस्ट २०२५ रोजी निधन झाले असून वयाच्या ८७ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. चिमणराव-गुंड्याभाऊ मालिकेतील गुंड्याभाऊंची अजरामर भूमिका बाळ कर्वे यांनी साकारली. मालिकेतील दिलीप प्रभावळकर आणि बाळ कर्वे यांची जोडी प्रेक्षकांना खूप आवडली. तसेच बन्याबापू चित्रपटातील त्यांची बापूची भूमिकाही विशेष गाजलेली. बाळ कर्वे यांच्या जाण्याने मराठी सिनेसृष्टीत मोठी पोकळी निर्माण झाली असून एक हरहुन्नरी अभिनेता हरपला आहे. 

बाळ कर्वे पेशाने इंजिनिअर होते. पण अभिनयात रस असल्याने त्यांनी अभिनेता होण्याचे स्वप्न पाहिले होते. बाळ कर्वे यांचे खरे नाव बाळकृष्ण होते. रंगकर्मी विजया मेहता हे त्यांचे नाट्य क्षेत्रातील गुरू होते. चिमणराव ही भारतीय टेलिव्हिजनची पहिली मालिका होती. त्यात त्यांनी गुंड्याभाऊंची भूमिका साकारली. त्यानंतर त्यांनी स्वामी या मालिकेत काम केले. या मालिकेतील त्यांची गंगोबातात्या ही भूमिका विशेष गाजली होती.

बाळ कर्वे यांनी टीव्ही मालिका आणि रंगभूमीवरील दर्जेदार कलाकृतींमध्ये काम केले. सूर्याची पिल्ले, रथचक्र, तांदुळ निवडता निवडता, मनोमनी, कुसुम मनोहर लेले अशा नाटकांमध्ये बाळ कर्वे यांनी साकारलेल्या भूमिका गाजल्या. प्रपंच, राधा ही बावरी, वहिनीसाहेब, उंच माझा झोका या मालिकांमध्ये बाळ कर्वेंनी काम केले होते. जैत रे जैत’ हा बाळ कर्वेंनी अभिनय केलेला पहिला चित्रपट. या सिनेमासोबतच सुंदरा सातारकर, चांदोबा चांदोबा भागलास का, चटक चांदणी, बन्याबापू अशा सिनेमांमधील त्यांच्या भूमिका विशेष गाजल्या. तसेच त्यांनी सई परांजपे यांच्या कथा या एकमेव हिंदी सिनेमात काम केले. उत्कृष्ट अभिनय, मराठी भाषेवर प्रभुत्व, नम्र स्वभाव, अभिनयाची समज आणि सहकलाकारांसोबतची मैत्री अशा गुणांमुळे बाळ कर्वे ओळखले जात असत.