लोकमान्य टिळक यांच्या नेतृत्वाखाली विसाव्या शतकाच्या सुरुवातीला भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने राष्ट्रीय पातळीवर स्वातंत्र्य चळवळ सुरू केली. १९२० मध्ये टिळकांच्या मृत्यूनंतर गांधींनी चळवळीची सूत्रे हाती घेत अहिंसेच्या व असहकाराच्या मार्गाने अनेक चळवळी सुरू केल्या. तसेच काही सशस्त्र क्रांतीकारी संघटनाही उभ्या राहिल्या. सरते शेवटी दुसऱ्या महायुद्धानंतर १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला ब्रिटनपासून स्वातंत्र्य मिळाले. परंतु त्यासाठी बहुसंख्य मुस्लिम असलेला भाग आजचा पाकिस्तान व बांगलादेश हे वेगळे व्हावे लागले.
भारतीय संविधान
आधुनिक भारताचे निर्माते व अद्वितीय बहुआयामी विद्वान असलेल्या कायदेपंडित डॉ. बाबासाहेब आंबेडकर आपल्या तब्येतीची पर्वा न करता अत्यंत मेहनतीने ३ वर्षामध्येच जगातील सर्वात महान व मोठे असे भारताचे संविधान लिहिले. घटनाकार बाबासाहेबांनी २६ नोव्हेंबर १९४९ रोजी भारतीय राज्यघटना संविधान समितीला सुपूर्द केली आणि २६ जानेवारी १९५० रोजी भारतीय घटनेची अंमलबजावणी सुरू झाली, भारत गणतंत्र राष्ट्र बनले व जगातील सर्वांत मोठे लोकशाही राष्ट्र अशी आज बिरुदावली मिरवत आहे. भारत संघराज्य बनले. भारतात १९५६ नंतर भाषावार प्रांतरचना झाली. फ्रान्सने आपल्या ताब्यातील भारतीय वसाहतीमध्ये सार्वमत घेऊन त्या भारताकडे सोपवल्या. पोर्तुगीजांशी भारताला लढावे लागले. १९६१ मध्ये भारताने आपले लष्कर पाठवून गोवा, दीव, दमण आणि दादरा आणि नगर हवेली पोर्तुगीजांच्या जोखडातून मुक्त केले.
विकासाला गती
स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भारताने सामान्य गतीने आर्थिक व सामाजिक सुधारणांचा स्वीकार करून वाटचाल केली. जम्मू आणि काश्मीर, पंजाबमध्ये १९८० च्या दशकात झालेला हिंसाचार व ईशान्येकडील आसाम, मणिपूर, मिझोरम, नागालैंड राज्यात सुरू असलेल्या हिंसाचार आणि गरिबीमुळे आदिवासी भागांत सुरू होत असलेला नक्षलवाद यांमुळे भारताच्या दहशतवाद ही एक महत्त्वाचा सुरक्षाविषयक मुद्दा बनला आहे. १९९० पासून भारताच्या विविध शहरात दहशतवादी हल्ले झाले आहेत. भारताचे चीन व पाकिस्तान याच्याशी संलग्न सीमांबद्दल वाद आहेत. त्यातून १९६२, १९४७, १९६५, १९७१ व १९९९ मध्ये युद्धे झाली. भारत अलिप्त राष्ट्रगट चळवळीचा तसेच संयुक्त राष्ट्रसंघाचा संस्थापक सदस्य आहे. इ. स. १९७४ आणि १९९८ मध्ये भारताने राजस्थानातील पोखरण येथे भूमिगत अणुचाचण्या यशस्वीरीत्या पार पाडून स्वतःला एक आण्विक शक्ती म्हणून सिद्ध केले आहे. १९९१ नंतर भारताने आर्थिक सुधारणांचा अंगिकार केल्यानंतर झपाट्याने आर्थिक प्रगती केली आहे. खासकरून सॉफ्टवेअर क्षेत्रामध्ये भारताने लक्षणीय कामगीरी केली.
..................................................................
स्वतंत्र भारत
१५ ऑगस्ट १९४७ मध्ये स्वातंत्र्य मिळाल्यावर २६ जानेवारी १९५० रोजी भारतीय संविधान अस्तित्त्वात आले. हा दिवस भारतीय प्रजासत्ताक दिन म्हणून ओळखला जातो. भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु होते तर पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद हे होते. १९५२ मध्ये पहिल्या सार्वजनिक लोकसभा निवडणुका पार पडल्या. तेव्हा भारत सर्वांत मोठे लोकशाही राष्ट्र झाले. १९५५ ते १९६० मध्ये भाषावार प्रांतरचनेचा आग्रह भारताच्या बहुतेक सर्व भागातून होऊ लागला. आंदोलने व जनाग्रहामुळे भारताची भाषावार प्रांतरचना झाली. पंडित नेहरुंच्या नेतृत्वाखाली भारताने साम्यवादाशी मिळतीजुळती अर्थव्यवस्था स्वीकारली. पंचवार्षिक योजनांनी नियोजन करून भारताने स्वातंत्र्याच्या सुरुवातीच्या वर्षांमध्ये धरणे, रस्ते व लोह पोलादांचे उद्योग यांना प्रोत्साहन दिले. हरितक्रांतीवर जोर देऊन भारताचे अन्न धान्याबाबतीत परावलंबन कमी करण्याचा प्रयत्न केला. १९६२ मध्ये चीनने भारतावर आक्रमण केले. या युद्धाचा धडा घेउन भारताने यानंतर लष्करी सामर्थ्य वाढवण्यावर भर दिला. यानंतर १९६५ मध्ये पाकिस्तानने आक्रमण केल्यावर भारताने पाकिस्तानचा पराभव केला. बांगलादेशातील घडामोडींमुळे १९७१ मध्ये पाकिस्तानविरुद्ध झालेल्या युद्धात पाकिस्तानचा निर्णायक पराभव करून स्वंतत्र बांगलादेशची निर्मिती केली.
१९६६ नंतरची १८ वर्षे भारतीय राजकारणावर इंदिरा गांधींचे वर्चस्व राहिले. १९७४ साली इंदिरा गांधीनी राजस्थानातील पोखरणमध्ये पहिली भूमिगत अणूचाचणी केली. १९७५-७६ मध्ये इंदिरा गांधींनी देशावर दीर्घकाळ आणीबाणी लागू केली. त्यामुळे संतप्त जनतेने पुढील निवडणुकीत १९७७ साली काँग्रेसच्या अबाधित सत्तेला धक्का दिला व भारतीय राजकारणात नवीन पर्व चालू झाले. मोरारजी देसाईच्या नेतृत्वाखालील भारतीय जनसंघाची सत्ता भारतात आली. १९८० साली अंतर्गत बेबनावामुळे जनसंघाचे ते सरकार कोसळले आणि त्यानंतर झालेल्या निवडणुकीत परत इंदिरा गांधींच्या नेतृत्वाखालील काँग्रेसची सत्ता आली.
फुटीरतावादी चळवळीला बळ
पाकिस्तानने १९७१ च्या बांगलादेशच्या पराभवानंतर छुपे दहशतवादी युद्ध भारताबरोबर करण्यास आरंभ केला. १९७० च्या दशकात प्रामुख्याने पंजाब व इतर राज्यातील फुटीरवादी चळवळींना प्रोत्साहन दिले. पंजाबातील खलिस्तानी दहशतवाद संपविण्यासाठी १९८४ मध्ये ऑपरेशन ब्लू स्टार ही कारवाई करून अमृतसरच्या सुवर्ण मंदिरातून दहशतवाद्यांना हुसकून लावले गेले. यानंतर काही काळातच इंदिरा गांधींची हत्या झाली. इंदिरा गांधी नंतर राजीव गांधींंच्या नेतृत्वाखालील काँग्रेसने सहानभूतीपोटी लोकसभा निवडणुकीत अभूतपूर्व यश मिळवले, स्थिर सत्तेच्या जोरावर भारतात इलेक्ट्रॉनिक क्रांती आणण्याचा प्रयत्न केला. श्रीलंका व मालदीव मधील हस्तक्षेपामुळे १९९१ मध्ये तमिळ दहशतवाद्यांनी राजीव गांधींची हत्या केली. १९८९ पर्यंत पंजाबमधील दहशतवाद नियंत्रणात आला. परंतु काश्मीरमधील फुटीरतावादी दहशतवादी चळवळ सक्रीय झाली व ९० च्या दशकात मुख्यत्वे ग्रासले. १९९२ मध्ये हिंदुत्वावर आधारित राजकीय पक्षांनी रामजन्मभूमीचा शतकानुशतके चाललेला विवादाला तोंड फोडले व त्याची परिणीती बाबरी मशीदीच्या विध्वंसात झाली.
खुली अर्थव्यवस्था स्वीकारली
१९९१ मध्ये डॉ. पी. व्ही. नरसिंहराव यांच्या नेतृत्वाखालील भारतीय सरकारने गॅट-करारावर स्वाक्षरी करून खुल्या आणि काही प्रमाणात भांडवलशाहीशी मिळत्या-जुळत्या अर्थव्यवस्थेचा स्वीकार केला. यामुळे दबलेल्या अर्थव्यवस्थेला संजीवनी मिळाली व काही वर्षांमध्येच भारताने आर्थिक स्थिती सुधारून सक्षम अर्थव्यवस्थेकडे वाटचाल सुरू केली. आता सध्या भारताची मिश्र अर्थव्यवस्था आहे.
-१९९८ मध्ये अटलबिहारी वाजपेयीनी पोखरणमध्ये दुसरी अणूचाचणी केली.
-१९९९ मध्ये पाकिस्तानच्या घुसखोरीनंतर भारताचे पाकिस्तानबरोबर तिसरे युद्ध झाले.
-२००८ मध्ये डॉ. मनमोहनसिंग सरकारच्या काळात भारत आणि अमेरिकेत अणूकरार झाला.
-इ. स. २०१४ मध्ये देशात सत्तापरिवर्तन झाले. प्रथमच भाजपची स्वबळावर सत्ता आली. मात्र, एनडीएची साथ त्यांना होती. त्यानंतर २०१९ आणि २०२४ मध्येही मोदींच्याच नेतृत्वाखाली सत्ता स्थापन झाली. मात्र, मागच्या दोन निवडणुकांच्या तुलनेत २०२४ मध्ये मोदींचे बहुमत घटले. मात्र, सलग २ वेळा पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारून दीर्घकाळ पंतप्रधानपदाची धुरा सांभाळणारे ते बिगर कांग्रेसमधील पहिले पंतप्रधान बनले.