मुंबई : प्रतिनिधी
राजधानी मुंबई हे महाराष्ट्राचे मुख्यालय आहे. येथे विधिमंडळ, सचिवालय आणि मंत्रालय, प्रशासकीय व प्रमुख संस्था आहेत. त्यामुळे विविध कामांसाठी महाराष्ट्राच्या कानाकोप-यातून नागरिक, राजकीय नेतेमंडळी, आमदार, खासदार, पदाधिकारी, विविध संघटनांचे प्रमुख मंत्रालयात येतात. आता मंत्रालयात येणा-या सर्व अभ्यागतांना आता केवळ डिजिटल प्रवेश पत्राद्वारेच प्रवेश देण्यात येईल. डिजीप्रवेश या ऑनलाईन अॅप आधारीत प्रणालीद्वारे मंत्रालय प्रवेशपास घेऊन मंत्रालयात प्रवेश मिळविता येणार आहेत. १५ ऑगस्ट २०२५ पासून ही नवी कार्यप्रणाली लागू केली जात आहे. अभ्यागतांकडे मंत्रालयात प्रवेश मिळविण्यासाठी आधार कार्ड, वाहन परवाना, पॅन कार्ड आदी शासन मान्य ओळखपत्र सादर करणे आवश्यक आहे.
अशिक्षित तसेच स्मार्टफोन नसलेल्या अभ्यागतांकरिता गार्डन गेट येथे ऑनलाईन अॅप आधारीत प्रणालीद्वारे मंत्रालय प्रवेश नोंदणीकरिता तसेच मदतीकरिता एक खिडकी उपलब्ध असणार आहे. त्यामुळे आता मंत्रालयात यायचे असेल तर नागरिकांना डिजिटल व्हावे लागणार आहे. ११ ऑगस्ट रोजी महाराष्ट्राच्या गृह विभागाने यासंदर्भात आदेश जारी केला. त्यानुसार यापूर्वी कार्यान्वित करण्यात आलेली मॅन्युअली प्रवेश पास देण्याची पद्धत बंद करण्यात आली आहे.
‘डिजीप्रवेश’ अॅप हे मोबाईल अॅप अॅण्ड्राईड आणि आयओएस अॅपल या दोन्ही प्रणालीवर उपलब्ध करून देण्यात आले आहे. आपल्या मोबाईलच्या प्रणालीनुसार अँण्ड्राईडमध्ये प्ले स्टोअरवर तर आयओएस अॅपलवर अॅपल स्टोअरवर डीजीप्रवेश हे सर्च केल्यास हे अॅप विनामूल्य डाऊनलोड करता येते. या अॅपवर सुरुवातीला केवळ एकदाच नोंदणी करणे आवश्यक राहील. नोंदणी झाल्यानंतर आधार क्रमांकावर आधारीत यंत्रणेद्वारे छायाचित्राची ओळख पटवून नोंदणी पूर्ण केल्यानंतर ज्या विभागात काम आहे, त्याचा स्लॉट बुक करून रांगेशिवाय प्रवेश घेता येईल. या संपूर्ण प्रक्रियेला तीन मिनिटांपेक्षा कमी कालावधी लागतो.